मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातर्फे संस्थापक विनायकराव पाटील यांच्या स्मृत्यर्थ आयोजित राज्यस्तरीय कथाकथन, काव्यवाचन, वादविवाद, वक्तृत्व व सुगम गायन स्पर्धाना चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतील विजेत्यांना १ लाख ३२ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली. विजेत्यांना अनुक्रमे ११ हजार, ६ हजार व ३ हजार रुपयांची पहिली तीन, तसेच उत्तेजनार्थ प्रत्येकी २ हजार रुपयांची रोख पारितोषिके, तसेच स्मृतिचिन्हे व प्रमाणपत्रे देण्यात आली.
स्पर्धेचे यंदा ३६ वे वर्ष होते. स्पर्धामध्ये राज्यभरातून ४०० स्पर्धक सहभागी झाले होते. कादंबरीकार रमेश इंगळे उत्रातकर व लेखक राजकुमार तांगडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. अध्यक्षस्थानी मंडळाचे उपाध्यक्ष मानसिंह पवार व प्रमुख म्हणून मोहनराव सावंत उपस्थित होते. वादविवाद स्पर्धेचे सांघिक प्रथम पारितोषिक (१२ हजार रुपये, गौरवपदक व प्रमाणपत्र) अहमदनगरच्या महात्मा फुले इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजने पटकाविले. वैयक्तिक पहिले पारितोषिक काजल बोरसे (एचपीटी आर्ट्स कॉलेज, नाशिक), दुसरे शेख अफसर यासीन (महात्मा फुले इन्स्टिटय़ूट, नगर), तिसरे अनिकेत म्हस्के (देवगिरी), उत्तेजनार्थ बबन ठाकरे (महात्मा फुले इन्स्टिटय़ूट) व सोनाली यादव (र. भ. अट्टल कॉलेज, गेवराई) यांनी मिळविले.
कथाकथन प्रकारात शंकर पांढरे (नांदेड), वेदान्त कुलकर्णी (पुणे) व धम्मपाल जाधव (औरंगाबाद) यांनी पहिली तीन बक्षिसे, तर अविनाश भारती व श्रीधर कोरडे (औरंगाबाद) यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले. सुगम गायन स्पर्धेत राहुल खरे (कन्नड), सुरभी कुलकर्णी व अमोल पवार (औरंगाबाद) यांनी पहिली तीन, तर उत्तेजनार्थ बक्षीस अनुजा पाठक (बीड) व अमोल जाधव (औरंगाबाद) यांनी मिळविले. वक्तृत्व स्पर्धेत निकिता पाटील (जळगाव), विवेक चिते (नाशिक) व श्रद्धा म्हस्के (बुलढाणा), तर उत्तेजनार्थ बक्षीस प्रवीण शिंदे (पुणे) व मंजूषा खताळ (औरंगाबाद) यांनी मिळविले. काव्यवाचन स्पर्धेत विवेक चित्ते (नाशिक), नीलेश चव्हाण (औरंगाबाद) व काजल बोरसे (नाशिक) यांनी पहिली तीन, उत्तेजनार्थ बक्षीस वेदान्त कुलकर्णी (पुणे) व अभिमन्यू राजगुरी (औरंगाबाद) यांनी मिळविले.