महाराष्ट्र शासनाच्या तिसऱ्या महिला धोरणाचा अंतिम मसुदा करण्यासाठी विषयनिहाय समित्या तयार करण्यात आल्या असून ‘स्वयंसहाय्यता बचत गट’ या समितीत येथील विश्वास ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे.
महिला व बालविकास मंत्री वर्षां गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्यमंत्री फौजिया खान यांच्या उपस्थितीत गठित केलेल्या विषयनिहाय समितीमध्ये विधानसभा व विधान परिषदेवर असलेल्या महिला प्रतिनिधी तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा समावेश आहेत. त्यात आ. विद्या चव्हाण, सुरेखा ठाकरे, दत्ता बाळसराफ, विजय कान्हेकर, नीलेश राऊत यांचा समावेश आहे. स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी ठाकूर राबवीत असलेल्या विविध कार्यप्रणालींचा यानिमित्ताने सन्मान झाला आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील पाच लाख महिला बचत गटातील सुमारे ५० लाख महिलांच्या सबलीकरणासाठी चालवीत असलेल्या यशस्विनी सामाजिक अभियानचे संचालक म्हणून महाराष्ट्रातील संपूर्ण कामकाज ठाकूर पाहतात. तसेच महाराष्ट्रात महिला बचत गटांना सर्वप्रथम कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या विश्वास बँकेचे ठाकूर हे संस्थापक अध्यक्ष आहेत.
महाराष्ट्रातील महिला बचत गटांवर काम करणाऱ्या संस्थांमध्ये आवश्यक समन्वय व सुसूत्रीकरण यावर शासन विशेष लक्ष देणार आहे. सद्यस्थितीत बचत गटांना ज्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे त्याचा अभ्यास करून त्यावर उपाय आखण्यात येणार आहेत. बचत गट संकल्पनेमुळे २०-२५ झालेल्या बदलांचा संख्यात्मक व गुणात्मक आढावा घेण्यात येणार आहे.
कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, पश्चिम बंगालसारख्या राज्यातील चांगल्या योजनांचा र्सवकष अभ्यास करून त्या राबवण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करणार आहे, असे ठाकूर यांनी नमूद केले आहे.