दिंडोरी मतदारसंघात निवडणूक यंत्रणेचे सूत्रबध्द नियोजन, मतदारांमध्ये करण्यात आलेली जनजागृती यामुळे काही प्रमाणात मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून येत असून ही वाढलेली टक्केवारी कोणत्या उमेदवाराला साथ देणारी आणि कोणासाठी घातक ठरेल, याची आकडेमोड करण्यात कार्यकर्ते मग्न आहेत.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात ६४.६३ टक्के मतदान झाले होते. या निवडणुती त्यात १० टक्क्याने वाढ झाली. उमेदवारांची वाढती संख्या, दुभंगलेली युती आणि आघाडी, मतदानासाठी हौसेने बाहेर पडलेला युवावर्ग या कारणांमुळे टक्केवारी वाढल्याचे सांगण्यात येत आहे. एकूण २४०६८९ मतदार असून त्यात पुरूष १२३६९५ तर स्त्री ११६९७४ अशी विभागणी आहे. एकूण १० उमेदवार रिंगणात असलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ, काँग्रेसचे रामदास चारोस्कर आणि शिवसेनेचे धनराज महाले यांच्यात अटीतटीची लढत झाल्याचे दिसत आहे. २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे धनराज महाले यांना ६८५६९ तर, त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नरहरी झिरवळ यांना ६८४२० मते मिळाली होती. केवळ १४९ मतांनी त्यावेळी महाले निवडून आले होते. यावेळी परिस्थिती वेगळी आहे. तिघा उमेदवारांची व्यक्तीगत तसेच पक्षाची ताकद असल्याने अंदाज बांधणे अवघड आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला या मतदारसंघातूना निसटती आघाडी मिळाली होती. लोकसभा निवडणूक शिवसेना, भाजप एकत्रित लढले होते. आता ते विभक्त असल्याने सेनेनेही भाजपच्या मतदानाची उणीव कशी भरून काढली असेल त्यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांविषयी काढलेल्या अनुद्गारामुळेही काही प्रमाणात मतदार नाराज झाल्याची चर्चा असून ते मतदार भाजपकडे वळल्याचे सांगितले जाते.
लोकसभा निवडणुकीप्रमाणे नरेंद्र मोदी यांची जादू येथे चालल्याचे जाणवले नाही. भाजपचा उमेदवार पुरेसा समर्थ नसणे हेही एक कारण त्यामागे असण्याची शक्यता आहे. काँग्रेसडून राहुल गांधी, बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य मोटय़ा नेत्यांच्या सभा घेतल्या गेल्या. राष्ट्रवादीकडून शरद पवार, छगन भुजबळ यांसह इतर नेत्यांच्या सभा झाल्या. शिवसेनेकडून मात्र रामदास कदम यांची एकमेव सभा झाली. शिवसेनेकडून वैयक्तीक प्रचारावर अधिक भर दिला गेला. एक महिन्यापासून प्रचारात गुंतलेल्या या प्रमुख नेत्यांना मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हायसे वाटले असले तरी मतदानाची वाढती टक्केवारी चिंतेत टाकणारी आहे. भाजपचा उमेदवार सामथ्र्यवान नसल्याने त्यांचे मतदान सेनेकडे वळाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
आघाडी तुटल्याने काँग्रेसला दीर्घ कालावधीनंतर या मतदार संघात आपला उमेदवार उभा करता आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांचे चेहरे चांगलेच फुलले होते. जातीय समीकरणांचा विचार करता काँग्रेस उमेदवारास फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पश्चिम भागातील मतदारांना बऱ्याच कालावधीनंतर काँग्रेसचे परिचित चिन्ह पाहावयास मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामतीनंतरचा सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ म्हणून शरद पवारांनी २००९ च्या निवणुकीत दिंडोरी विधानसभा मतदार संघाचा उल्लेख केला होता. त्याच निवडणुकीत नेमका शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे पुन्हा मिळविण्यासाठीे कादवा कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांपासून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, ठिकठिकाणच्या ग्रामपालिका सदस्यांसह स्थानिक पदाधिकारी प्रचारात गुंतले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून राष्ट्रवादीचे पाळेमुळे घट्ट असल्याने प्रचार त्यांच्याकडून जोरदार झालेला असला तरी त्याचा त्यांना कितपत फायदा झाला असेल हे सांगता येणे अवघड आहे.
२००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीतील असंतुष्टांची रसद शिवसेनेला मिळाल्याने सेनेचा उमेदवार निवडून आला होता. यावेळेस परिस्थिती तशी नव्हती. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी युवा वर्गाला मार्गदर्शन करत प्रचार यंत्रणा राबविली. वैयक्तीक प्रचारावर लक्ष केंद्रीत केले गेले. भाजपला मात्र अनुकूल वातावरणाचा फारसा लाभ घेता आला नसल्याचे दिसत आहे. त्यांचा उमेदवार  अपरिचित आणि स्थानिक नसल्याने कार्यकर्त्यांकडून त्यांना अपेक्षित सहकार्य मिळू शकले नाही.
मनसे व माकपने देखील सूत्रबद्ध प्रचार यंत्रणा राबवत प्रमुख उमेदवारांच्या उरात धडकी भरवली. परंतु वरीष्ठ नेत्यांकडून त्यांनाही अपेक्षित पाठबळ मिळाले नाही. पेठ व दिंडोरी या दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात पेठमधील दोन तर दिंडोरीतील उमेदवार त्यापेक्षा अधिक असल्याने मतविभागणी कोणाला लाभदायक ठरेल ते रविवारी मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voting percentage increase in dindori assembly constituency
First published on: 17-10-2014 at 02:03 IST