आशा वळसंगकर यांच्या १९व्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक व्यं. ना. वळसंगकर यांनी लिहिलेल्या व रजत प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या ‘ऐतिहासिक टाळय़ा आणि किंकाळय़ा’, ‘बुमरँग’ व ‘पर्यटनाची मौजच भारी’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन प्रा. डॉ. मंगला वैष्णव व निळकंठ कोठेकर यांच्या हस्ते झाले.निळकंठ कोठेकर यांनी या वेळी बोलताना ‘बुमरँग’ हे नाटक लिहिताना नाटकाला आवश्यक असलेली वाङ्मयीन व प्रयोगात्मक मूल्यांचा वापर करून वळसंगकर यांनी नाटकाचे कथानक छान रंगवले आहे. ‘पर्यटनाची मौजच भारी’ या पुस्तकात त्या त्या स्थळाशी संबंधित असलेल्या दंतकथा, आख्यायिका, पौराणिक कथा यांचा आधार घेत वर्णन केले आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचताना त्या त्या ठिकाणी पर्यटनाला गेल्याचा आनंद मिळतो. प्रा. डॉ. मंगला वैष्णव म्हणाल्या, की ‘ऐतिहासिक टाळय़ा व किंकाळय़ा’ पुस्तकातील कथा सत्यावर आधारित असून त्यातून संस्कार व मनोरंजनही होते. यातील टाळय़ा आनंदाच्या, सुखाच्या, धन्यवादाच्या आहेत. प्रकाशक अशोक कुमठेकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. विद्या गाडगीळ यांनी केले.