नालेसफाई घोटाळ्याच्या चौकशीत दोषी आढळलेल्यांवर कारवाई केली नाही तर न्यायालयात जाऊन खासगी फिर्याद दाखल करण्याचा इशारा शिवसेनेचे सतीश धाडगे यांनी महापालिका आयुक्त विजय कुलकर्णी यांना दिला.
अशा प्रकरणात कारवाई करण्याबाबतचे सरकारी परिपत्रक त्यांनी आपल्या निवेदनासोबत जोडले आहे. पावसाळ्यापूर्वी करायच्या नालेसफाई कामातील घोटाळ्याचे हे प्रकरण धाडगे यांनी मनपाकडूनच माहितीच्या अधिकारात माहिती मागवून उघड केले. एकाच कामाच्या फक्त ८ दिवसांच्या अंतराने काढलेल्या निविदांमध्ये दराचा फार मोठा फरक असल्याचा हा प्रकार आहे. धाडगे यांच्या आरोपांवरून आयुक्त कुलकर्णी यांनी लेखा परिक्षकांमार्फत याची चौकशी केली. मात्र त्यांच्या अहवाल वस्तुनिष्ठ न वाटल्यामुळे त्यांनी फेरचौकशीचा आदेश दिला. त्यात त्यांनी घनकचरा विभागप्रमुखांना दोषी ठरवले आहे. मात्र सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी ही चौकशी चुकीची असल्याची टिका करत हा अहवाल फेटाळून लावला. त्यानंतर यावर पुढे काहीच हालचाल झालेली नाही. त्यामुळे धाडगे यांनी आयुक्त कुलकर्णी यांना निवेदन देत अशा प्रकरणांमध्ये प्रशासन प्रमुखाने त्वरीत कारवाई करण्याबाबतचे सरकारी परिपत्रक दिले. त्याचबरोबर घनकचरा विभागप्रमुखांशिवाय यात अन्य अधिकारीही दोषी असल्याचे व त्यांच्यावरही कारवाई केली जाणे गरजेचे असल्याचे त्यात नमूद केले आहे. अशी कारवाई झाली नाही तर न्यायालयात जाऊन खासगी फिर्याद करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.