० दारणा धरण परिसरात शिरकाव करणाऱ्यांवर लाठीमार
० मनसेच्या माजी आमदारांसह १५ जणांना अटक
० आंदोलकांवर गुन्हा दाखल
० दारणा धरणावर बंदोबस्त
मराठवाडय़ाची तहान भागविण्यासाठी इगतपुरीतील दारणा धरणातून पाणी सोडण्याकरिता गुरूवारी सकाळचा मुहूर्त निवडला गेला खरा, मात्र स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने ऐनवेळी या नियोजनात फेरबदल करत गनिमी काव्याचे तंत्र अवलंबून आंदोलकांना कात्रजचा घाट दाखविल्याचे पहावयास मिळाले. सकाळी जलसमाधीसाठी आंदोलक जमले असता या विभागाने पाणीच सोडले नाही. यावेळी धरणाच्या हद्दीत बेकायदेशीरपणे घुसखोरी करून गोंधळ घालू पाहणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. मनसेचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्यासह नांदगाव बुद्रुकच्या माजी सरपंचास यावेळी पोलिसांनी अटक केली. तसेच मनसेच्या जवळपास १५ प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.
जायकवाडीसाठी दारणाचे पाणी देण्यास प्रारंभापासून स्थानिकांचा विरोध आहे. या पाश्र्वभूमीवर, धरण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करत जमावबंदी लागू करण्यात आली. स्थानिकांना विश्वासात न घेता दारणा धरण रिकामे करण्याचा घाट शासनाने घातल्याचा आरोप करत मनसेचे आ. काशिनाथ मेंगाळ यांनी धरण परिसरात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे दारणा धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सकाळपासून तणावपूर्ण वातावरण होते. सलग पाच ते सहा दिवस हे पाणी सोडले जाणार असल्याने सुरक्षिततेच्यादृष्टीने यंत्रणांनी जय्यत तयारी केली होती. पोलीस उपअधीक्षक राजेंद्रसिंग हजारी यांनी येथे ठाण मांडले. सकाळी घोटीखुर्द, बेलगाव तऱ्हाळे, धामणी या गावांमधील आंदोलक नांदगाव बुद्रुक या गावी जमा झाले. मेंगाळ, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, तालुकाध्यक्ष भगिरथ मराडे आदींच्या नेतृत्वाखाली तब्बल दोनशे आंदोलक वाहनांमधून दारणा धरणालगतच्या परिसरात दाखल झाले. पोलिसांनी त्यांना या ठिकाणी रोखत आत जाण्यास मज्ज्वाव केला. परंतु, आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलीस व आंदोलक यांची बाचाबाची झाली. प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यास परवानगी मिळावी असे सांगून आंदोलकांनी तिथे प्रवेश मिळविला.
प्रवेशद्वारावर ठाण मांडत आंदोलकांनी पाणी सोडू नये, अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. यावेळी मेंगाळ व नांदगाव बुद्रुकचे माजी सरपंच भाऊसाहेब गायकर यांनी पोलिसांचा विरोध डावलून धरणाजवळ जाण्यात यश मिळविले. पोलीस त्यांना अडविण्याच्या प्रयत्नात असताना गायकर यांनी थेट पाण्यात उडी घेतली. मेंगाळही उडी मारण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना रोखले. त्यानंतर गायकरही पाण्यातून बाहेर आले.
यावेळी प्रवेशद्वारावरील आंदोलकांनीही धरणाकडे धाव घेतल्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यामुळे आंदोलकांची एकच पळापळ झाली. परिसरात कमालीचा गोंधळ उडाला. परंतु, पोलीस यंत्रणा आंदोलकांना धरण परिसरात जाण्यापासून रोखण्यात यशस्वी झाली. या घडामोडीनंतर मेंगाळ, गायकर यांच्यासह मनसेच्या जवळपास १५ प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली.
दरम्यान पाटबंधारे विभागाची पाणी सोडण्याची तयारी अद्याप बाकी असल्यामुळे गुरूवारी दिवसभरात कोणत्याही क्षणी अथवा शुक्रवारी सकाळी पाणी सोडले जाईल, अशी माहिती देण्यात आली. आंदोलनाची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने या विभागाने ‘गनिमी कावा’ तंत्राचा कौशल्यपूर्वक वापर केला. आंदोलन प्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीही धरण परिसरात आंदोलनाचा प्रयत्न केला.
आंदोलकांना पिटाळून लावल्यानंतर धरण परिसरात बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. आसपासच्या गावांचेही दारणातून पाणी कधी सोडले जाईल, याकडे लक्ष आहे. दारणा नदीकाठावरही पाटबंधारे व पोलीस विभागामार्फत गस्त घातली जात असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेण्यात येत आहे.