माजी खासदार बाळासाहेब विखे यांनी पारनेर तालुक्यातील जनतेच्या भल्यासाठी येथे सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. मात्र राजकारण्यांनी त्याचे वाटोळे केल्याची टीका कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली. तालुक्यातील जनतेची इच्छा असेल तर विखे कारखाना पारनेर कारखाना चालविण्यास घेईल असेही त्यांनी सांगितले.
दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी बांधण्यात आलेल्या १७६ बंधाऱ्यांचे जलपूजन, रायतळे येथील कोरडवाहू शाश्वत शेती अभियानाचा शुभारंभ आदी विविध योजानांचे उद्घाटन विखे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. दिवसभराच्या तालुका दौऱ्यानंतर पारनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार नंदकुमार झावरे होते. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल झावरे, तालुकाध्यक्ष डॉ. भास्कर शिरोळे, सीताराम खिलारी, संभाजी रोहकले, केरूभाऊ रोहकले, शिवाजी सालके, राहुल शिंदे, महेश शिरोळे, बाळासाहेब पठारे, बाजार समितीचे संचालक मारुती रेपाळे आदी या वेळी उपस्थित होते.
पारनेर कारखाना विखे कारखान्याने चालविण्यास घेण्याची मागणी माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी आपल्या भाषणात केली होती. तो धागा पकडून विखे म्हणाले, मस्तावलेल्या लोकांमुळे या कारखान्याची वाटोळे झाले असून नागरिकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे, कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा बोलावून कारखान्याच्या अधोगतीस कारणीभूत ठरलेल्यांकडून नुकसान वसूल केले पाहिजे. ज्वारी, हरबरा या रब्बी हंगामातील पिकांसाठी यंदापासून हवामानावर आधारित पीक विमा योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगतानाच वाटाण्यासाठीही पीक विमा योजना सुरू करण्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मंगळवारी पारनेर येथे केली. तालुक्यातील डाळिंबाचे वाढते क्षेत्र लक्षात घेऊन येत्या सहा महिन्यांत जवळा परिसरात डाळिंब प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचेही विखे यांनी जाहीर केले.
नंदकुमार झावरे यांचेही या वेळी भाषण झाले. डॉ. भास्कर शिरोळे यांनी स्वागत केले. राहुल झावरे यांनी प्रास्ताविक केले. मारुती रेपाळे यांनी आभार मानले.