विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाची अवघ्या करवीरनगरीत धांदल उडाली असताना गणेशचतुर्थीच्या पूर्वसंध्येला रविवारी २१ फुटी गणेशमूर्तीचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. दिलबहार तरुण मंडळ, पूल गल्ली या मंडळांच्या श्री मूर्ती आज झांजपथकाच्या निनादात मंडळाच्या मंडपात नेण्यात आल्या. सायंकाळी घरगुती गणपती नेण्यासाठी गर्दी झाल्याचे चित्र शहरात दिसत होते. दुसरीकडे घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.
    करवीरनगरीत २१ फुटी गणेशमूर्ती हे गणेशोत्सवातील वैशिष्टय़ आहे. गणेशचतुर्थीदिवशी गणेशमूर्ती नेण्यासाठी शहरभर भाविकांची झुंबड उडालेली असते. त्यामुळे मोठय़ा मूर्ती एकदिवस आगोदर नेण्याची पद्धत काही मंडळांनी सुरू केली आहे. पुल गल्ली तालिम मंडळाने गेल्या सहा वर्षांची परंपरा जपत रविवारी दुपारी श्रींची मिरवणूक काढली. लालबागचा राजा रूपातील मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती. झांजपथकाच्या निनादात व मोरयाचा गजर करीत मिरवणूक निघाली होती. मंडळाचे अध्यक्ष अनिल अष्टेकर, रणजित जाधव, नूर मुनशी,उमेश आष्टेकर, भरत सावंत या पदाधिकाऱ्यांसह मंडळाचे शेकडो कार्यकत्रे मिरवणुकीत सहभागी झाले होते.
    दिलबहार तालिम मंडळाची मिरवणूकही गणेशोत्सवातील खास आकर्षण असते. याही मंडळाने आजच २१ फुर्टी श्रींची मिरवणूक वाजतगाजत काढली. पारंपरिक झांजपथकाच्या ठेक्यात श्रींची मिरवणूक निघाली होती. सायंकाळी मंडळाच्या मंडपामध्ये श्रींची प्रतिष्ठापना विधीवत करण्यात आली. तर लेटेस्ट तरुण मंडळाने पर्यावरणाचा जागर करीत यंदा फायबरची गणेशमूर्ती बनवून घेऊन उत्सवाला पर्यावरण स्नेहीचा संदेश दिला आहे.
    दरम्यान गणरायाचे आगमन होण्यास आता अवघे काही तास उरले असताना घरोघरी व सार्वजनिक मंडळाना श्री मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचे वेध लागले आहेत. विद्युत रोषणाईने अवघे शहर झळाळून निघाले आहे. सजावटीचे साहित्य, विद्युत माळा, पान-फुले, फटाके, गणेश गीतांची सिडी आदी वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत भाविकांची गर्दी उसळली होती. करवीरसह संपूर्ण जिल्हाच गणरायाच्या आगमनासाठी सज्ज झाला आहे.