पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या उपनगरी गाडय़ांमधून आज दुपारच्या रणरणत्या उन्हातून प्रवास करताना अचानक अंगविक्षेप करणारे, पाय झटकणारे, हातवारे करणारे आणि वेडावाकडा चेहरा करीत भयभीत नजरेने फुटबोर्ड न्याहाळणारे असंख्य प्रवासी दिसू लागले.. मोबाइल कानाला लावून मिटल्या डोळ्यांनी डुलक्या घेत संगीताचा आस्वाद घेणारे, गेम खेळणारे, चॅटमध्ये रमणारे प्रवासी अचानक कसे बदलले असा प्रश्न चेहऱ्यावर उमटण्याआधीच अन्य प्रवाशांना त्याचे उत्तरही मिळाले. ही किमया होती, रेल्वेगाडय़ांवर मालकी हक्क गाजविल्याच्या आविर्भावात सैरावैरा पळणाऱ्या झुरळांची!.. भर दुपारी उपनगरी गाडय़ांवर झुरळांच्या झुंडींनी चढविलेला हल्ला प्रवाशांना अनुभवता आला.. रेल्वेगाडय़ा मात्र, त्यांच्या गतीने धावतच होत्या. सुदैवाने, गर्दी ओसरल्यानंतरच्या वेळातच झुरळांच्या फौजा बाहेर पडल्याने, अप्रिय प्रसंग टळले.
दुपारी साडेबारा-एक वाजल्यानंतर विरार-बोरिवलीकडून चर्चागेटकडे धावणाऱ्या गाडय़ांमधील गर्दी काहीशी ओसरलेली असते. महिला प्रवासी, पहिल्या वर्गातील प्रवासी तर ऐसपैस बसूनच प्रवास करत असतात. चर्चगेटहून बोरिवलीला आलेली गाडी परतीच्या प्रवासाआधी काही मिनिटे फलाटावर विसावते, आणि चर्चगेटकडे जाणारी गर्दी त्या गाडीतील सोयीची जागा पकडून स्थिरावते. काही वेळात गाडी चर्चगेटकडे निघते आणि एखादा प्रवासी चुळबूळ करू लागतो. अंगविक्षेप सुरू होतात. त्याच्या चेहऱ्यावर भीतीची छटा उमटू लागते. शांतपणे बसलेल्या आपल्या सहप्रवाशामध्ये अचानक झालेल्या या बदलामुळे अचंबित झालेल्या दुसऱ्या प्रवाशाला आश्चर्य करण्यासाठी लागणारा वेळही अपुरा पडावा, एवढय़ा वेळात दुसरा प्रवासीही तसेच करू लागतो. बघता बघता गाडीतील सारे प्रवासी अंगविक्षेप करू लागतात. पाय झटकू लागतात, सुरक्षित जागा शोधू लागतात आणि अखेर, पुढचे स्थानक आल्यावर चक्क उतरून जातात.
मग सुरू होते, पुढच्या गाडीची प्रतीक्षा.. अगोदरची गाडी जवळपास रिकामी झालेली असते. या गाडीतून उतरणारे प्रवासी नंतरच्या गाडीत चढतात, तेव्हा त्याच गाडीतील प्रवाशांचा लोंढा मात्र, उतरण्याच्या गडबडीत असतो. त्यांचे चेहरेही काहीसे घाबरलेलेच असतात. पण ते लक्षात येण्याआधीच एक गर्दी उतरते आणि नवी गर्दी गाडीत चढते. पुन्हा, पहिल्या गाडीतील अनुभव सुरू होतो. अगोदरपासून गाडीत असलेले उरलेसुरले प्रवासी कसानुसा चेहरा करून स्वत:लाच धीर देत असतात, त्यांच्यात नव्या गर्दीची भर पडते.. पायाखाली येणारी, अंगावर चढणारी, शर्ट-पँटमधून थेट आत शिरणारी अनेक रंगांची, वेगवेगळ्या आकाराची निर्भीड झुरळे माणसावर आक्रमण करू लागतात, आणि ‘सहन होत नाही, सांगताही येत नाही’ अशा अवस्थेत हतबलपणे पुढचे स्थानक गाठण्यासाठी प्रवास सुरू होतो. पश्चिम रेल्वेच्या प्रवासातील असंख्य आव्हाने सहजपणे पेलणाऱ्या मुंबईकर प्रवाशाला आज मात्र, अशा अनोख्या अनुभवाचा पहिलाच धडा मिळाला..
झुरळांच्या या अचानक आक्रमणामुळे प्रवासी भांबावले असले, तरी रेल्वेला मात्र त्याचे काहीच सोयरसुतक नव्हते. एकामागून एक धावणाऱ्या अनेक गाडय़ांवर झुरळांच्या झुंडी चालून आलेल्या असतानाही, रेल्वेगाडय़ा मात्र शांतपणे, ‘सेवाभावाने’ धावतच होत्या. कुठेही कोणतीही उद्घोषणा नव्हती. झुरळ या केवळ शब्दानेच अंगावर झुरळ पडल्यासारखे वाटून घाबरगुंडी उडणाऱ्या वर्गाच्या डब्यात कमी गर्दीच्या वेळी हा प्रकार उफाळल्याने, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, हे त्या रेल्वे प्रशासनाचे सुदैव!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईच्या लोकलमध्ये ब्लाटा या प्रजातीतील झुरळे आढळतात. ती आकाराने लहान व काहीशा मातकट रंगाची असतात. घरांमध्ये आढळणाऱ्या पेरीप्लॅनेटा अमेरिकाना या झुरळांप्रमाणे त्यांना ओलाव्याची गरज भासत नाही. दिवसा डब्याच्या फटींमध्ये आराम करत असलेली ही झुरळे रात्रीच्या वेळी बाहेर पडून प्रवाशांनी टाकलेले अन्न फस्त करतात. तापमानात वाढ झाल्याने पत्रे अधिकच तापल्याने ही सर्व झुरळे दुपारच्या वेळी बाहेर पडली असावीत. अर्थात, माणसांच्या आधीपासून पृथ्वीवर अस्तित्वात असलेला हा प्राणी सर्व प्रकारच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात माहीर आहे. त्यामुळे उच्च तापमानातही ती टिकाव धरणार.
     राहुल खोत, कीटकतज्ज्ञ, बीएनएचएस.

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Western railway attack of cockroach
First published on: 26-03-2015 at 12:10 IST