एकीकडे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या  ‘कौन बनेगा करोडपती’चे सातवे पर्व सुरू होत असून खुद्द बिग बी या पर्वासाठी जोरदार तालमी करत आहेत. तर दुसरीकडे याच प्रसिद्ध ‘केबीसी’चा मराठी अवतार असलेला ‘कोण होईल मराठी करोडपती’ या रिअ‍ॅलिटी शोचे पहिले पर्व येत्या महिन्याभरात संपणार आहे. तीन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या शोसाठी आत्तापर्यंत राज्यभरातून तब्बल ७० लाख प्रवेशिका आल्या होत्या. एक कोटी जिंकण्याची संधी देणाऱ्या या शोमध्ये सर्वात जास्त २५ लाख रुपयांची रक्कम जिंकण्यात स्पर्धकांना यश आले आहे. ‘कोण होईल मराठी करोडपती’ला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहता या शोचे दुसरे पर्वही निश्चितपणे आणणार असल्याचे ईटीव्ही मराठीच्या सूत्रांनी सांगितले.
‘कौन बनेगा करोडपती’चे सातवे पर्व सोनी टीव्हीवर ६ सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. त्याआधी या शोचा मराठी अवतार संपणार असल्याची माहिती ईटीव्ही मराठीच्या सूत्रांनी दिली असून या शोचा अखेरचा भाग हा अभिनेत्री निर्मिती सावंत आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर चित्रित झाला आहे.  ‘कोण होईल मराठी करोडपती’ या शोचे उद्दिष्टच मुळी ज्ञानाच्या आधारावर अधिकाधिक अर्थार्जन करण्याची संधी देऊन त्यांचे आयुष्य बदलणे हे होते. आणि खरोखरच या मराठी शोमुळे महाराष्ट्रातील खेडोपाडय़ातून आलेल्या लोकांना इथे या हॉट सीटवर बसून आपले आयुष्य बदलण्याची संधी मिळाली. भाजीवाल्यापासून ते डॉक्टरांपर्यंत अनेकांना त्यांच्या स्वप्नपूर्तीपर्यंत आणण्यासाठी मदत करण्याचा हा अनुभव खूप आनंददायी होता’, असेही सचिन खेडेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.