आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शहरात विविध राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने तसेच मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना विश्वासात घेण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे संक्रांतीनिमित्त आयोजित करण्यात येणारा महिलांचा हळदीकुंकाचा कार्यक्रम.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षाच्या महिला आघाडीमधील पदाधिकारी, नगरसेविका आपापल्या प्रभागात महिला मेळावे घेऊन त्यांच्यापर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.  
मतदारांना ‘आपलेसे’ करून घेण्यासाठी विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते कोणकोणत्या युक्त्या करतात, याचा प्रत्यय दोन महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने येऊ लागला आहे. निवडणुकांचे राजकीय वातावरण तापविण्यासाठी वॉर्डात विविध कार्यक्रम आयोजित केले जात असतानाच, विविध राजकीय पक्षाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि नगरसेविका मात्र संक्रांतीच्या निमित्ताने हळदी-कुंकू, तीळगूळ समारंभाच्या माध्यमातून मतांचे वाण मागत आहेत! सध्या संक्रांतीचे दिवस असल्याने हळदीकुंकू व तीळगूळ समारंभाच्या निमित्ताने महिलांचे मेळावे आयोजित करीत आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडी गेल्या महिन्याभरापासून विविध उपक्रम राबविण्यासाठी सक्रिय झाले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून पक्षाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असून तसा प्रचार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे.
काँग्रेसकडून पुन्हा खासदार विलास मुत्तेमवार यांच्या नावाची जोरदार चर्चा असून त्यांनी काम सुरू केले. मुत्तेमवार अनेकांना चालणार नसले तरी पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यानंतर अनेकांना इच्छा नसताना त्यांचे काम करावे लागणार आहे. काँग्रेसच्या अनेक महिला नगरसेवकांनी संघटनात्मक काम वाढविण्यासाठी हळदकुंकू कार्यक्रम आयोजित केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे युवती मेळाव्यासोबत महिलांचे मेळावे आयोजित केले जात आहेत. शहरातील विविध भागात गेल्या काही दिवसांपासून हळदीकुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना संघटित केले जात असून त्यात शहरातील समस्या मांडल्या जात आहेत.
हळदी-कुंकू, तीळगूळ समारंभाला खर्चही फारसा येत नाही. त्यामुळे अधिकाधिक महिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी असे समारंभ आयोजित करण्यास प्राधान्य देत आहेत, असे विविध पक्षातील महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी  सांगितले.
हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रभागातील महिला एकत्र येत आहेत. राजकीय रंग देऊ नये असे काही महिलांचे मत असले तरी ज्या पक्षातर्फे किंवा महिला संघटनातर्फे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यांची छायाचित्रे अशा कार्यक्रमात हमखास लावली जातात. लोकसभा निवडणुकीनंतर लगेच विधानसभा निवडणुका असल्याने प्रत्येक विधानसभा मतदार संघात महिला आघाडीतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
हळदी-कुंकू, तीळगूळ आणि इतरही समारंभामधून लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मतपेटीवरील ‘संक्रांत’ टाळण्यात विविध राजकीय पक्षाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी यशस्वी होतात की नाही ते मात्र निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल हे मात्र तितकेच खरे.