युवकांना संघटित करून राष्ट्र उभारणीसाठी सज्ज करण्यामध्ये यश आल्यास भारताला जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची संधी प्राप्त होणार आहे. त्यादृष्टीने भारतीय तरुणांमधील ऊर्जा सकारात्मक आणि प्रगतीकेंद्रित देशाच्या विकासासाठी वापरली जावी, अशी भावना यंग इंडियन्स परिषदेमध्ये विविध वक्तयांनी शुक्रवारी व्यक्त केली.
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय), इंडिया अॅट ७५ आणि यंग इंडियन्स यांच्यातर्फे आयोजित नर्चिरग द पॉझिटिव्ह पॉवर्स ऑफ इंडिया या विषयावरील परिषदेत आयसीआयसीआय बँकेचे अध्यक्ष के. व्ही. कामत, यंग इंडियन्सच्या राष्ट्रीय अध्यक्षा अनुपमा आर्य, सीआयआयच्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष राजन नवानी, इंडिया अॅट ७५ च्या अॅपेक्स कौन्सिलचे अध्यक्ष एस. गोपालकृष्णन, केंद्रीय नियोजन मंडळाचे सदस्य अरुण मैर, खासदार प्रकाश जावडेकर आणि सुप्रिया सुळे यांनी सहभाग घेतला.
प्रकाश जावडेकर म्हणाले, देशातील युवकांना भ्रष्टाचारमुक्त सुप्रशासनाची गरज वाटत आहे. विकासासाठी राजकीय नेतृत्व आणि प्रशासन एकत्र आले पाहिजे हा आदर्श गुजरातने घालून दिला आहे. पंतप्रधानांविषयी आदर आहे. ते सत्तेच्या खुर्चीवर आहेत. पण, त्यांच्या हाती सत्ता नाही.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, सत्तारूढ आघाडीतील घटक पक्षांमध्ये काही विषयांवर मतभेद असले तरी, विकासाच्या मुद्दय़ावर सर्वाची एकजूट आहे. देशाचे पंतप्रधान सक्षम असून त्यांनी परकीय थेट गुंतवणूक (एफडीआय) हा निर्णय घेतला आहे. चांगले प्रशासन देण्यासाठी सरकार वचनबद्धही आहे.
के. व्ही. कामत म्हणाले, आर्थिक साक्षरतेला गती देत देशाचा विकास करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेता येऊ शकतो. गेल्या दहा वर्षांत बँकांच्या शाखांमधील व्यवहार ९४ टक्क्य़ांवरून कमी होत १२ टक्क्य़ांवर आले आहेत. तर, एटीएममधील व्यवहार १४ पटींहून अधिक वाढले आहेत. एटीएमच्या पलीकडे जाऊन मोबाईलच्या माध्यमातून तुमची बँकच तुमच्या हातामध्ये आली आहे. त्या उपकरणाद्वारे बँकेच्या शाखेत करता येणारे सर्व व्यवहार करता येणार आहेत.