जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व निर्णय राजकीय हेतूने होत असल्याने राजकारण हे प्रभावी समाजकारणच आहे. काठावर बसून राजकारण हे वाईट लोकांचे काम असते, असा विचार करू नका, तर घाण साफ करण्यासाठी तरुणांनी राजकारणात येऊन करिअर करावे, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केले. जात, धर्म, प्रांतवादाच्या नावावरील मतपेटय़ांनी अराजकता निर्माण केली. देशाला महासत्ता बनविण्यासाठी परकीय विचारांची होळी करून राष्ट्रभक्तांची मतपेटी तयार करण्याचे काम तरुणांनी करावे, असेही ते म्हणाले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ४८ वे प्रदेश अधिवेशन येथे बाळासाहेब आपटेनगर येथे झाले. राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील अंबेकर, प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पाठक, प्रदेशमंत्री शैलेंद्र दळवी, संयोजक प्रा. सतीश पत्की, नितीनचंद्र कोटेचा, शहरमंत्री विजय कोठुळे आदी उपस्थित होते. अधिवेशनाला राज्यभरातून तरुण मोठय़ा संख्येने उपस्थित आहेत. उद्या (रविवारी) समारोप आहे.
मुंडे म्हणाले, की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासूनच आपला सामाजिक चळवळीशी संबंध आला. बाळासाहेब आपटे, यशवंतराव केळकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. परिषदेला व आपल्यालाही ६४ वष्रे झाली आहेत. ही परिषद चांगला माणूस घडवणारी संस्था आहे. देशात आज अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. शिक्षण क्षेत्रातील शिस्त आणि अभ्यासू वृत्ती कमी झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
आपल्याकडे स्वातंत्र्य, तर अमेरिकेत मुक्त स्वातंत्र्य आहे. मात्र, हातात बंदूक नव्हे, तर पेन व डायरी घेणारेच परिवर्तन घडवू शकतात. पारतंत्र्यात बाबू गेणूने परकीय वस्त्रांची होळी करून लढा पुकारला. आता तरुणांनी परकीय विचारांची होळी करून आपल्या संस्कृतीचे जतन करीत लढा उभारावा. साडेतीनशे जिल्ह्य़ांत दहशतवादी कारवाया सुरू आहेत. त्यातून देश पोखरला गेला आहे. या साठी युवा पिढीने सजग राहणे आवश्यक आहे, असे मुंडे म्हणाले.
डॉ. िहमतराव बावसकर यांचेही भाषण झाले. सुनील अंबेकर यांनी विद्यार्थ्यांच्या लढाऊ वृत्तीला समाजाने प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. नरेंद्र पाठक यांनी परिषदेच्या उपकमांची माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth career politics gopinath munde
First published on: 22-12-2013 at 01:55 IST