वेगाने विस्तारत जाणाऱ्या ठाणे शहरातील नागरीकरणामुळे मोठमोठय़ा उद्योग समूहांनी या शहरात व्यावसायिक मॉल उभारण्याकडे पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केले असून शहरात अतिशय मोक्याच्या ठिकाणी उभ्या असलेल्या जुन्या मॉलची तोळामासा अवस्था पाहून नव्या मॉलमधील व्यवस्थापनांनी तरुणांना आपले केंद्रिबदू बनविले आहे. अगदी काल-परवापर्यंत तलावपाळी, राम मारुती रोड, गोखले मार्ग हे ठाण्यातील तरुणाईचे अड्डे मानले जात. आता त्याची जागा महामार्गालगत उभ्या राहिलेल्या बडय़ा मॉल्समधील पॉपटेटस्, टिंबक टू, अरबन तडका, मॅनचॅस्टर युनायटेड कॅफे यांसारख्या ‘जॉइन्टस्’ने घेतली आहे. विशेष म्हणजे, या तरुणाईला राम मारुती रोडवरून मॉल्सपर्यंत खेचत आणण्यासाठी व्यवस्थापनांनी वेगवेगळ्या योजना राबविण्यास सुरुवात केली असून मॉलमधील ‘हॅपी अव्हर’चे तासही आता वाढू लागले आहेत.  
तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘फेसबूक’सारख्या सोशल नेटवर्किंग साइटस्चा वापर करून त्यांच्यापर्यंत नव्याने सुरू होणारी दुकाने आणि उपक्रमांची माहिती पुरविणे यांसारखे प्रयत्न मॉल व्यवस्थापनांनी सुरू केले आहेत. ठाण्यातील तलावपाळी, राममारुती रोड या ठिकाणी एरवी सळाळत्या तरुणाईचा अधिक वावर असे. वाहतूक कोंडी, वाढलेले प्रदूषण, गजबजाटामुळे ही ठिकाणे तरुणांना आता नकोशी वाटू लागली आहेत. दिवाळी, दसऱ्याला गजबजून जाणाऱ्या या ठिकाणी तरुणाईचा उत्साह आता अपवादानेच पाहायला मिळतो. पाश्चात्त्य संस्कृतीचे आकर्षण असलेल्या तरुणांना शहरातील महामार्गाच्या लगत उभ्या असलेल्या मॉल्सनी आपलेसे करून घेतले आहे.
तब्बल १२ वर्षांपूर्वी ठाण्यातील घोडबंदर रोड येथे सीनेवंडर नावाचा मॉल उभा राहिला. ठाण्यातील सर्वात पहिले मल्टिप्लेक्स सिनेमागृह याच मॉलमध्ये सुरू झाले. त्यानंतर काही काळातच शहरातील तीनहात नाकासारख्या मोक्याच्या भागात इटरनेटी मॉल उभा राहिला. अबालवृद्धांसाठी आकर्षणाचा विषय ठरलेल्या या मॉलमधील व्यावसायिक गाळ्यांनाही गेल्या काही वर्षांत उतरती कळा लागली आहे. याच काळात मुलुंड आणि भांडुप येथे उभ्या राहिलेल्या ‘आर मॉल’ आणि ‘निर्मल लाइफस्टाइल’ मॉलमध्ये गर्दीचे पाट वाहू लागले. वेगवेगळ्या ब्रॅन्डची आकर्षक दुकाने, तीन-चार स्क्रीनचे मल्टिप्लेक्स दुकानांमधील चांगल्या ऑफर्स, वावरण्यासाठी भव्य वातानुकूलित जागा आणि रेस्टॉरंटची रेलचेल या मॉलमध्ये होती. सायंकाळी ६ ते ८ या ‘हॅपीअवर्स’मध्ये त्याच किमतीत मिळणारे दुप्पट पेय तरुणांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले. ठाण्यात उभ्या राहिलेल्या मॉल्समध्ये नेमक्या याच विविधतेचा अभाव जाणवत असे. शहराबाहेरील मॉल्सच्या दिशेने वळलेल्या तरुणाईला लक्ष्य करत ठाण्यात पुन्हा एकदा मॉल्सचे जाळे विस्तारू लागले असून राम मारुती, गोखले मार्गाला पर्याय शोधणाऱ्या तरुणांना यामुळे मोक्याची ठिकाणे सापडू लागली आहेत. ठाण्यातील प्रत्येक मॉलमध्ये तरुणांमध्ये ‘हॅपीअवर्स’ साठी लोकप्रिय असलेली हॉटेल्स आहेत. यामध्ये तरुणांचा मोठय़ाप्रमाणावर वावर असतो. घोडबंदर रोड परिसरात मोठय़ा प्रमाणावर गृहसंकुले उभी राहिली आहेत. या भागात ‘आरमॉल’ आणि नितीन कंपनीजवळ ‘कोरम’ आणि ज्युपिटर हॉस्पिटलजवळ नव्यानेच भव्य स्वरूपात उभी राहिलेला ‘व्हिवाना’ असे मॉल तरुणांची मोठी गर्दी खेचू लागले आहेत. तरुणांमधील सर्वात लोकप्रिय अशा ‘फेसबुक’ या सोशल नेटवर्किंग साइटवर ठाण्यातील प्रत्येक मॉल्सच्या व्यवस्थापनाने स्वत:चे ‘पेज’ तयार केले आहेत. या मॉलमध्ये येणारे नागरिक कोठून येतात, त्यांच्या आवडीनिवडी याविषयी ग्राहकांशी चर्चा करून आवश्यक सुधारणा केल्या जातात आणि मॉलचा दर्जा, लोकप्रियता उत्तम राहील यावर भर देण्यात येतो, असे कोरम मॉलचे सेंट्रल मॅनेजर देवा ज्योतूला यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth moved away from pond to mall
First published on: 20-07-2013 at 12:25 IST