07 July 2020

News Flash

ए. वैद्यनाथन

चेन्नईच्या सेंट लोयोला महाविद्यालयातून पदवी घेऊन, अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली

ए. वैद्यनाथन

सहकार क्षेत्राला गेल्या दोन दशकांपासून लागलेल्या ग्रहणाने आता सहकारी बँकिंगसारखे क्षेत्रही ग्रासून जाऊ लागलेले असताना, या क्षेत्राची दुखणी आणि बलस्थाने जाणणाऱ्या ए. वैद्यनाथन यांच्यासारख्या अभ्यासू तज्ज्ञाची निधनवार्ता अधिकच दु:खद ठरते. कोइमतूर मुक्कामी, बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

नियोजन आयोगाचे माजी सदस्य आणि ग्रामीण सहकारी पतपेढय़ांच्या सद्यस्थितीचा अभ्यास करून सरकारला २००४ साली अहवाल देणाऱ्या कृतीगटाचे अध्यक्ष, ही वैद्यनाथन यांची ओळख. हा अहवाल ‘वैद्यनाथन समिती अहवाल’ म्हणूनच आजही ओळखला जातो. त्या शिफारशींची परवड या अहवालानंतर, अंमलबजावणीतही सहभाग असताना वैद्यनाथन यांनाच पाहावी लागली होती. ग्रामीण पत-व्यवस्थेला संजीवनी देण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरांशी चर्चा सुरू असतानाच बातमी आली – सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे! याही परिस्थितीत काम पुढे नेण्यासाठी वैद्यनाथन तयार होते, पण सहकाऱ्यांनी आणि काही जाणकार उच्चपदस्थांनीही, ‘आता काही होणार नाही’ असा अभिप्राय दिल्याने हे काम थांबले. पण वैद्यनाथन यांनी पाठपुरावा सुरू ठेवला. त्यांच्या निकटवर्तीयांची ही आठवण, त्यांच्या चिवटपणाची प्रचीती देणारी आहे.

चेन्नईच्या सेंट लोयोला महाविद्यालयातून पदवी घेऊन, अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली आणि १९५६ मध्ये मायदेशी परतून, ‘नॅशनल कौन्सिल फॉर अप्लाइड इकॉनॉमिक रीसर्च’ या संस्थेत ते काम करू लागले. भारतातील अन्नसुरक्षेच्या आणि ग्रामीण व कृषी विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरलेल्या ‘१९६२ ते १९७२’ या दशकात ते नियोजन आयोगाचे सदस्य होते. याच काळात, रोम येथील ‘एफएओ’ (अन्न व कृषी संघटना) अधिवेशनात त्यांची कामगिरी महत्त्वाची ठरली. त्यांना पुढली संधी जागतिक बँकेत मिळाली. तेथे १९७२ ते ७६ या काळात काम करून भारतात परतल्यावर, दिल्लीत स्थायिक होण्याचा पर्याय नाकारून ते तिरुवनंतपुरम येथे आले. तेथे ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज’ या संस्थेच्या उभारणीत त्यांनी के. एन. राज यांच्या बरोबरीने, सिंहाचा वाटा उचलला. याच संस्थेत अगदी अलीकडेपर्यंत ते अध्यापन करीत. संस्थेच्या प्रशासकीय कामातून मात्र त्यांनी स्वत:ला मोकळे केले होते.

संख्याशास्त्र हा त्यांच्या आवडीचा विषय. ‘राष्ट्रीय नमुना पाहणी’तील शेतीविषयक व ग्रामीण अभ्यासाच्या पद्धतींची घडी घालून देण्याचे काम त्यांनी केले, त्याच अभ्यासपद्धती आजही वापरात आहेत. ग्रामीण विकास, पाणी-व्यवस्थापन आणि संख्याशास्त्रीय अभ्यास यांचा परस्परसंबंध विशद करणारे त्यांचे पुस्तकही अनेक अभ्यासकांकडून नावाजले गेले.

देशाच्या इतिहासात काळा दिवस ठरलेल्या ‘२६/११’ या दिवशी, २००८ सालच्या सरत्या नोव्हेंबरात एका बैठकीनिमित्ताने वैद्यनाथन मुंबईत ‘ताजमहाल पॅलेस हॉटेला’त होते. हल्ल्यातून ते सुखरूप बचावले, पण या हॉटेलचे मोठे नुकसान होताना पाहावे लागले आणि अनेकांप्रमाणेच तेही व्यथित झाले. भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या ‘नियोजनबद्ध’ दिशेची अशीच धूळधाण त्यांना आपल्या हयातीत पाहावी लागली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 12:01 am

Web Title: a vaidyanathan profile abn 97
Next Stories
1 वामनराव तेलंग
2 डॉ.ऑलिव्हर ई. विल्यमसन
3 कर्ट थॉमस
Just Now!
X