28 February 2021

News Flash

अख्तर अली

१९७४ मध्ये मुंबईत त्यांनी व्यावसायिक टेनिसपटू म्हणून कारकीर्दीतील अखेरचा टेनिस सामना खेळला

अख्तर अली

क्रिकेट म्हणजे जीव की प्राण असणाऱ्या भारतात एखाद्या अन्य क्रीडा प्रकारातील खेळाडूने सहज नावलौकिक मिळवणे कठीणच. परंतु महान टेनिसपटू अख्तर अली त्याला अपवाद ठरले. १९६०-७०च्या काळात टेनिसमध्ये स्वत:सह भारताची वेगळी ओळख निर्माण करून एकापेक्षा एक नामांकित खेळाडू घडवणाऱ्या अख्तर यांचे ७ फेब्रुवारी रोजी वयाच्या ८१व्या वर्षी निधन झाले.

कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी प्रदीर्घ काळ लढा देणाऱ्या अख्तर यांनी डेव्हिस चषक या मानाच्या टेनिस स्पर्धेत सलग आठ वर्षे (१९५८-१९६४) भारताचे प्रतिनिधित्व केले. परंतु त्यापूर्वी १९५५ मध्ये विश्वाला प्रथमच अख्तर यांची चुणूक दिसली होती. विम्बल्डनमधील मुलांच्या (कनिष्ठ) स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारण्याचा पराक्रम अख्तर यांनी केला. त्याच वर्षांच्या अखेरीस त्यांनी पुरुषांच्या राष्ट्रीय अजिंक्यपद टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. त्यामुळेच त्यांची थेट भारतीय संघात निवड करण्यात आली आणि तेथून मग अख्तर यांनी मागे वळून पाहिले नाही. डेव्हिस चषकासह अनेक स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अख्तर यांची खेळण्याची आक्रमक वृत्ती आणि संघहितासाठी सर्वस्व अर्पण करण्याची जिद्द वाखाणण्याजोगी होती. १९७४ मध्ये मुंबईत त्यांनी व्यावसायिक टेनिसपटू म्हणून कारकीर्दीतील अखेरचा टेनिस सामना खेळला. एक निष्णात टेनिसपटू म्हणून छाप पाडणाऱ्या अख्तर यांनी निवृत्त झाल्यानंतर प्रशिक्षणातही मोलाचे योगदान दिले. लिएण्डर पेस, विजय अमृतराज, रमेश कृष्णन यांसारख्या खेळाडूंना मार्गदर्शन करतानाच त्यांनी स्वत:चा मुलगा झीशानलादेखील टेनिसपटू म्हणून घडवले. सानिया मिर्झा, सोमदेव देवबर्मन या खेळाडूंचे आदर्श असणाऱ्या अख्तर यांनी अनेक डेव्हिस चषकांसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळली. पुढे २००८च्या डेव्हिस चषकात त्यांनी भारताचे नेतृत्वसुद्धा (न खेळणारा कर्णधार) केले. त्यामुळेच अख्तर यांचे नाव भारतीय टेनिसच्या इतिहासात नेहमीच आदराने घेतले जाईल. कोलकाता साऊथ क्लब येथे अख्तर यांची युवा टेनिसपटूंना घडवण्याची मोहीम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती. १४ ते १८ या वयोगटातील मुला-मुलींना येथे मोफत प्रशिक्षणही दिले जाते. त्याशिवाय करोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीदरम्यान अख्तर यांनी गरजूंना आर्थिक मदत करण्याबरोबरच युवा खेळाडूंना ऑनलाइन मार्गदर्शन देण्याचे कार्य करून सामाजिक बांधिलकी जपली. अख्तर यांचा आदर्श ठेवून युवा खेळाडूंनी टेनिसमध्ये भारताचा तिरंगा उंचावणे, ही त्यांना खरी आदरांजली ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2021 12:06 am

Web Title: akhtar ali profile abn 97
Next Stories
1 मठूर गोविन्दन कुट्टी
2 र. ग. कर्णिक
3 प्रा. डी. एन. झा
Just Now!
X