विमा क्षेत्रातील कंपन्यांमध्ये अतिशय अवघड जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये अ‍ॅलाइस जी. वैद्यन या एक आहेत. त्यांना नुकताच ब्रिटन-भारत यांच्यात विमा संबंध आणखी वृद्धिंगत करण्यासाठी ब्रिटनमधील ऐतिहासिक महत्त्वाचा असा ‘फ्रीडम ऑफ दि सिटी’ हा पारंपरिक सन्मान देण्यात आला. भारतीय विमा क्षेत्रात परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी वैद्यन यांनी मोठे योगदान दिले आहे.

परदेशात विशेषकरून ब्रिटनमध्ये भारताचे विमा क्षेत्रातील आर्थिक व्यवहार मजबूत करण्यासाठी अ‍ॅलाइस यांनी केलेले काम अजोड असेच आहे. ब्रिटन व भारत यांच्यात पुनर्विमा (रीइन्शुरन्स) क्षेत्रात मोठा वाव आहे. त्या संधीचा पुरेसा लाभ आपल्या देशाला मिळवून देण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली. विमा व्यवसायात तंत्रज्ञानामुळे अनेक बदल होणार आहेत, त्यात भारताने मागे राहू नये यासाठीही त्यांनी आधीपासूनच या व्यवसायाला धोरणात्मक दिशा देण्यात योगदान दिले आहे. परदेशी कंपन्यांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जे आवश्यक आहे ते त्यांनी वेळीच ओळखले. भारतात पीक विमा व आरोग्य विमा योजनेत जगातील अनेक मोठय़ा योजना राबवल्या, त्याला अ‍ॅलाइस यांचा पाठिंबाच आहे. विशेष म्हणजे विमा उद्योगात जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या सरकारी विमा कंपनीची धुरा सांभाळणाऱ्या त्या पहिल्याच महिला अधिकारी आहेत. विज्ञान पदवीधर असूनही वैद्यन यांनी केरळ विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एमए पदवी घेतलेली असून त्यानंतर अमेरिकेतील बोस्टन हार्वर्ड बिझिनेस स्कूलमध्ये त्यांनी १९८३ च्या सुमारास सर्वसाधारण विमा उद्योगाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर विमा व्यवसायात शाखाधिकारी पदापासून त्यांनी काम केले, नंतर विभागीय, प्रादेशिक अधिकारी व नंतर कॉर्पोरेट जग असा त्यांचा प्रवास झाला. ब्रिक्स देशांसह परदेशी कंपन्यांना विमा क्षेत्र खुले करण्याचे स्वागत करताना त्यांनी नेहमीच स्पर्धेची तयारी ठेवली. त्यांच्या कारकीर्दीत जीआयसीला परदेशातून ४५ टक्के महसूल मिळाला आहे हे विशेष. एलआयसी, एसीजीसी, केनइंडिया अ‍ॅश्युरन्स, जीआयसी हाऊसिंगच्या संचालक मंडळावर त्या आहेत, शिवाय आशियन रिइन्शुरन्स कॉर्पोरेशन, बँकॉक अँड इंटरनॅशनल इन्शुरन्स सोसायटी या संस्थांच्या त्या सदस्य आहेत.  तीस वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी प्रत्येक आव्हानात संधी शोधल्यानेच पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात त्यांनी नाव कमावले. जीआयसीचा पसारा आता ब्रिटनशिवाय दुबई, मलेशिया, मॉस्को, चीन या देशांतही विस्तारला आहे. त्यांच्या या निवडीने आर्थिक क्षेत्रात नेतृत्वाची आस असलेल्या महिलांना उत्तेजन मिळणार आहे.