जगभरातील आरंभाच्या चित्रकर्त्यांनी ‘टवाळा आवडे विनोद’ ही उक्तीच शिरोधार्य मानल्यासारखी परिस्थिती होती. नायक हा सदासर्वगुणसंपन्न नरपुंगव, नायिकेला गटविण्याचा मक्ता असलेल्या ताकदीचा, वर त्या ताकदीतही गायनाचा हळवेपणा साधणारा. अशा वेळी हास्यकलाकार नेहमी दुय्यम वा तिय्यमच मानले जात. बस्टर केटन, हॅरोल्ड लॉयड आणि चार्ली चॅप्लीन या विनोदवीरांच्या चित्रपटकाळातही, सर्वाधिक मागणी मात्र पल्प फिक्शनमधून जन्म घेतलेल्या देमार सिनेमांना होती. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात झालेल्या सामूहिक मनोभंगातून सामान्य नागरिकांना कलाकारांनीच खऱ्या अर्थाने सावरले. संगीतक्षेत्रामध्ये दादा मंडळी प्रयोग करीत होती. ध्वनिमुद्रणामध्ये याच काळात गुणवंत अभियंत्यांनी नवे तंत्र विकसित केले आणि अमेरिकी शहर/खेडय़ांतून मोठय़ा प्रमाणावर तरुणांच्या जथ्याने दिग्दर्शन-अभिनय क्षेत्रामध्ये उडी घेतली होती. स्टॅण्डअप कॉमेडियन्ससाठी खूपच उभरता काळ असताना जेरी लुईस या अभिनेत्याचा उदय झाला.

आई-वडील अभिनयक्षेत्रात असल्यामुळे त्यांना इथे शिरकावासाठी फार तोशीस करावी लागली नाही; पण त्यांनी या लाभाचा दुरुपयोग न करता स्वत:ला घडविण्यात मेहनत घेतली. डीन मार्टिन या समविनोदी विचारांच्या मित्रासोबत त्याने १९४६ पासून अमेरिकेतील ५००हून अधिक क्लब्समध्ये कॉमेडी शो राबविले. त्यांचे विडंबनपट तिकीटबारीवर गंमत करणारे होते. ‘मार्टिन आणि लुईस’ नावाने गाजलेल्या या दुकलीची विभक्ती झाली, तेव्हा लुईस यांची कारकीर्द संपुष्टात येईल, असे भाकीत वर्तविण्यात आले होते. मात्र त्या सर्वाना जेरी लुईस यांनी गप्पच बसविले. मित्राशी अभिनय काडीमोड केल्यानंतर जेरी लुईस याचे विनोद-दादापण मोठय़ा पडद्यावर पसरले. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता अशा सर्व आघाडय़ांवर हॉलीवूडमध्ये ‘जेरी लुईस पंथ’ तयार झाला. आपल्याकडेच नाही, तर अमेरिकेतर सर्वच जगामध्ये विनोदी कलाकारांनी एकलव्यी बाण्याने जेरी लुईस यांच्या शैलीची आवर्तने केली. आय. एस. जोहरपासून मेहमूद, जगदीप यांनी वठविलेल्या व्यक्तिरेखांवरील प्रभाव पाहायचा असेल, तर जेरी लुईस यांच्या सुरुवातीच्या सर्वच चित्रपटांसोबत (जे आज यूटय़ूबवर मोफत आहेत.) ‘बेलबॉय’, ‘नट्टी प्रोफेसर’, ‘डिसॉर्डरली ऑर्डर्ली’ हे सिनेमे खासकरून पाहावेत. असामान्य अभिनयऊर्जा खच्चून भरलेल्या या कलावंताने सहा ते सात दशके अमेरिकेतील रेडिओसोबत मोठा आणि छोटा पडदा गाजविला. एकाच चित्रपटात तीन (नट्टी प्रोफेसर) आणि दुसऱ्यात तर सात भूमिका (फॅमिली ज्वेल्स) करण्याचे पराक्रम त्यांनी केले आहेत. वर प्रत्येक भूमिकेत वैविध्य राखण्याची कसरतही त्यांनी लीलया सांभाळली. गंमत म्हणजे या अशा प्रयोगांचेदेखील भारतीय अवतार एके काळी आपल्या सुपरस्टार्सनी वठवून वाहवा वगैरे मिळविली होती.

जेरी लुईस हे कायम चित्रपटक्षेत्रात विनोद किंवा अभिनयासाठी दादा कलाकार म्हणून वावरत राहिले. रॉबर्ट डी निरो यांच्यासोबतचा ‘किंग ऑफ कॉमेडी’ असो किंवा जॉनी डेप याच्या कारकीर्दीच्या सुरुवातीचा ‘अ‍ॅरिझोना ड्रीम’; त्यातील लुईस यांच्या भूमिकांमधील ताकद पाहिली, तर मोठमोठय़ा म्हणविल्या जाणाऱ्या कलावंतांचे तोकडेपण लक्षात येऊ शकेल. स्नायू-पेशी अपक्षय (मस्क्युलर डिस्ट्रॉफी) या आजारावरील उपचारांसाठी त्यांनी प्रचंड मोठा निधी उभारला. अभिनयाखेरीजच्या फावल्या वेळेत या आजाराच्या उच्चाटनासाठी सर्वतोपरी साह्य़ केले. हॉलीवूडमधील तीन पिढय़ा तारांकित, वलयांकित अशा सर्व कलाकारांसोबत जेरी लुईस यांनी काम केले आहे. गेल्या वर्षी ‘द ट्रस्ट’ चित्रपटात त्यांनी शेवटची भूमिका बजावली. वृद्धापकाळाने या चिरतरुण अभिनेत्याचा मृत्यू २० ऑगस्ट रोजी झाला असला, तरी पुढली १०० वर्षे त्यांचा लौकिक सहज जिवंत राहील.