07 July 2020

News Flash

बलबीर सिंग दोसांझ (थोरले)

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा  तिरंगा फडकावण्याचे कार्य बलबीर सिंग यांच्या भारतीय संघाने केले.

बलबीर सिंग दोसांझ (थोरले)

‘स्वातंत्र्यापूर्वी ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे आधारस्तंभ होते तर स्वातंत्र्यानंतरच्या काळात बलबीर सिंग दोसांझ (थोरले) यांनी ती जबाबदारी नेटाने पार पाडली,’- ही भारतीय हॉकीचे माजी कर्णधार अजित पाल सिंग यांनी बलबीर सिंग यांना वाहिलेली आदरांजली, ‘सीनिअर’ (थोरले) म्हणून ओळखले जाणाऱ्या बलबीर दोसांझ यांच्या कर्तृत्वाची ओळख करून देणारी आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा  तिरंगा फडकावण्याचे कार्य बलबीर सिंग यांच्या भारतीय संघाने केले. ब्रिटिश राजवटीला विरोध करतानाच त्यांनी हॉकीतील आपले कौशल्य अधिक विकसित केले. फाळणीनंतर बलबीर सिंग व अन्य खेळाडूंच्या पहिल्या तुकडीने भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ गाजवला! पूर्व पंजाबच्या मोगा तालुक्यातून बलबीर सिंग यांनी हॉकी खेळायला सुरुवात केली. मोगा येथेच शिकत असताना हॉकीवेडामुळे ते नापास झाले. मात्र लाहोरच्या सिख नॅशनल महाविद्यालयात पुढील शिक्षण  सुरू ठेवून, उत्तम हॉकीपटू म्हणून नावलौकिक मिळवत ते अमृतसरच्या खालसा महाविद्यालयात दाखल झाले. हॉकीप्रावीण्यामुळे त्यांना पंजाब पोलीसमध्ये नोकरी मिळाली. खालसा महाविद्यालयाचे प्रशिक्षक हरबेल सिंग आणि १९३२च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेते डिकी कार यांच्या आग्रहापायी ते १९४८च्या ऑलिम्पिकसाठी मुंबईला (तेव्हाचे बॉम्बे) सराव चाचणीसाठी दाखल झाले. १९४८च्या लंडन ऑलिम्पिकसाठी निवडलेल्या भारतीय संघात बॉम्बेच्या खेळाडूंचा अधिक भरणा होता. निवडलेल्या ३९ खेळाडूंत बलबीर यांचे नाव नव्हते. पण त्यांना वगळल्याने टीका झाल्यावर, राष्ट्रीय सराव शिबिरात दाखल होण्यासाठी त्यांना तार धाडण्यात आली! दोन दिवसांच्या सरावातच हाड मोडले, पण दुखापतीतून बरे झाल्यावर त्यांचा २० जणांच्या ऑलिम्पिक संघात समावेश झाला.अव्वल खेळाडूंच्या उपस्थितीतही बलबीर सिंग यांनी १९४८च्या ऑलिम्पिकमध्ये छाप पाडली. ग्रेट ब्रिटनसारखा प्रतिस्पर्धी समोर असतानाही बलबीर यांनी अंतिम फेरीत दोन गोल झळकावले. देशाला ऑलिम्पिकमधील पहिले सुवर्णपदक देणाऱ्या या संघाचे साऱ्या देशवासीयांनी कौतुक केले. १९५२च्या हेलसिंकी व १९५६च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये बलबीर सिंग यांनी भारताला सुवर्णपदके मिळवून देण्यात मोलाचा हातभार लावला. खेळाडू व प्रशिक्षक म्हणून अनेकदा त्यांना टीकेला सामोरे जावे लागले. पण सर्व काही पचवून त्यांनी कार्य सुरूच ठेवले. एकाहून एक सरस खेळाडूंसह खेळताना ‘देशातील सर्वोत्तम मध्य आघाडीवीर’ म्हणून लौकिक मिळवणारे बलबीर सिंग वयाच्या ९५व्या वर्षी आपल्यातून निघून गेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2020 12:01 am

Web Title: balbir singh dosanjh profile abn 97
Next Stories
1 मेजर गुरुदयाल सिंह जलानवालिया (निवृत्त)
2 नाना भिडे
3 डॉ. हर्षवर्धन
Just Now!
X