भाषेची मोडतोड होऊ नये. उदा.- ‘मोडतोड’ या शब्दाऐवजी ‘तोडफोड’ हा उसना शब्द वापरला जाऊ नये, अशी अपेक्षा वृत्तपत्रांकडून अनेक जण आजही ठेवतात हे चांगलेच. काही जण तर, ‘तुम्ही भाषा योग्यरीत्या वापरली नाहीत, तर आम्ही भाषेचा योग्य वापर करण्यास कसे शिकणार?’ अशीही तक्रार करतात. त्यामागे एक अपेक्षा असते. ही अशीच जबाबदारीची अपेक्षा एके काळी नभोवाणी माध्यमाकडूनही केली जाई, हे आताच्या ‘एफएम’ काळात खरे वाटणार नाही! पण ‘आकाशवाणी’ अर्थात ‘ऑल इंडिया रेडिओ’ म्हणजेच नभोवाणी, असे समीकरण असतानाच्या काळात ही अपेक्षा केली जाई आणि ती सहसा पूर्ण होई, हे विशेष. ही उच्चारित भाषा जबाबदारीने वापरणे ज्यांच्याकडून शिकल्याची आठवण अनेकांना आजही आहे, असे माजी इंग्रजी वृत्तनिवेदक म्हणजे बरुण हालदार. त्यांचे निधन ३ जुलै रोजी झाले, हे समजल्यानंतर अनेक जण हळहळले ते इंग्रजी शिकवणाऱ्या आवाजाचा अंत झाला म्हणून!   ‘धिस इज ऑल इंडिया रेडिओ.. द न्यूज, रेड बाय बरुण हालदार’ या परवलीच्या शब्दांनी पाच-दहा मिनिटांसाठी, इंग्रजी बातम्यांच्या समृद्धीचे दार खुले होई. बातम्या सरकारीच; पण ‘बरुणदा’ त्यांना चपखल शब्दयोजनेचे, आवाजाच्या चढउतारांचे, उचित विरामांचे कोंदण देत. त्यांचे अनेक सहकारी, ‘आम्ही त्यांचे ऐकून शिकलो’ म्हणतात. हालदार यांच्या रोजच्या कामातून ज्यांना वस्तुपाठ मिळाला, त्यांत आजचे अनेक पत्रकारही आहेत.

२३ जून १९३५ रोजी जन्मलेले बरुण हालदार दार्जिलिंगच्या शाळेत शिकून महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोलकात्यास परतले.  वसतिगृह-शाळेतील शिस्त आणि शिष्टाचारांची तालीम आणि कधी तरी आपणहून आवडलेला शेक्सपिअर यांचा परिणाम हालदार यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसे. महाविद्यालयात असताना त्यांनी शेक्सपिअरच्या ‘ज्यूलिअस सीझर’मध्ये प्रमुख भूमिकाही केली होती. कोलकाता आकाशवाणी केंद्राच्या ‘पाश्चात्त्य संगीत विभागा’त उद्घोषक म्हणून त्यांनी आधी काम केले. मग वृत्तनिवेदकपदाचा अर्ज भरला आणि अल्पावधीत त्यांची नियुक्ती नवी दिल्लीच्या प्रमुख केंद्रात झाली. तेथे १९९८ पर्यंत ते कार्यरत होते. ‘वृत्तनिवेदन विभागाचे प्रमुख’ या पदावरून ते निवृत्त झाले. त्यांच्यामागे पत्नी व दोन कन्या आहेत. सुखवस्तू घरातील बरुण हालदार यांनी आर्थिक कमाई सरकारी नियमांनुसारच केली; परंतु स्वत:सह इतर अनेकांची भाषिक श्रीमंती त्यांनी वाढविली. ते काही साहित्यिक नव्हते; पण विशेषनामांचे उच्चार, व्याकरणशुद्ध वाक्यरचना, शब्दांचा ओघ कायम राखणे, अशी भाषेची अनेक व्यवधाने त्यांनी चोखपणे पाळली!