News Flash

बेजवाडा विल्सन

डोक्यावरून मैला वाहून नेण्याची प्रथा आपल्या समाजात पूर्वीपासून आहे

डोक्यावरून मैला वाहून नेण्याची प्रथा आपल्या समाजात पूर्वीपासून आहे, त्याला विरोध करण्याच्या भानगडीत पडू नकोस, असा सल्ला त्या मुलाच्या आई-वडिलांनी त्याला दिला होता. कर्नाटकातील कोलारच्या सोन्याच्या खाणीच्या क्षेत्रात जन्माला येऊनही त्यांच्या नशिबी लोकांचा मैला वाहून नेण्याचे भोग होते. दलित समाजात जन्माला येणे हा शाप ठरला होता, समाजाच्या चालीरीतींनी त्यांचे जीवन काळवंडून गेले होते. आता आपल्याही वाटय़ाला हेच भोग येणार असे वाटून त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी आत्महत्येचा विचारही केला. पाण्याच्या टाकीवरून उडी मारायचे ठरले पण नंतर विचार पालटला. मानवी मैला डोक्यावर वाहून नेण्याच्या विरोधात आपणच लढायचे असे त्या मुलाने ठरवले. त्याचे नाव बेजवाडा विल्सन. यंदाचे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते. सामाजिक कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. बेजवाडा यांच्याच प्रयत्नातून १९९३ मध्ये या प्रथेवर बंदी घालण्यात आली.

राशेल  व जेकब बेजवाडा  यांचे ते सर्वात लहान पुत्र. माडिगा समाजातील थोटी जातीत जन्माला आल्याने शाळेतील मुलेही त्यांना चिडवायची. त्यांचे वडील १९३५ पासून सफाई कर्मचारी होते, ते डोक्यावर मैला वाहून नेत.  बेजवाडा  यांनी मात्र वेगळी वाट धरली. ते आंध्रातील शाळेत जाऊ लागले, वसतिगृहात राहून शिकू लागले. हैदराबादच्या आंबेडकर विद्यापीठातून ते राज्यशास्त्रात पदवीधर झाले व समाजसेवा सुरू केली. मैला वाहून नेण्याच्या पद्धतीमुळे अनेक मुले शाळा सोडून ते काम सुरू करीत, या मुलांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी व्यावसायिक शिक्षणाची सोय त्यांनी केली. एकदा त्यांचा भाऊ त्यांना रोजगार विनिमय केंद्रात घेऊन गेला. अधिकाऱ्याने अपेक्षित काम म्हणून ‘भंगी’ असे अर्जावर लिहिले. बेजवाडाने तो अर्ज तिथल्या तिथे फाडून फेकून दिला. ही जिद्द त्याने दाखवली नसती तर आज या समस्येतून दलित व अस्पृश्यांना सुटण्याची जी जिद्द मिळाली ती कदाचित मिळालीही नसती. मुकी बिचारी कुणी हाका.. काहीही काम करून घ्या.. जणूकाही माणूस म्हणून त्यांना आत्मसन्मान नाहीच, अशी परिस्थिती होती ती बदलली. भारतातील शेवटचा टोपली संडास नष्ट झाल्याशिवाय व मैला वाहून नेण्याची अमानवी पद्धत बंद केल्याशिवाय गप्प बसणार नाही असे त्यांनी ठरवले. दहा वर्षांपूर्वी ३० लाख लोक मैला वाहून नेण्याचे काम करीत होते, ते प्रमाण खूपच खाली आले. सर्वोच्च न्यायालयानेही या समस्येवर कडक भूमिका घेऊन राज्यांकडून प्रतिज्ञापत्रे घेतली. १९९४ मध्ये त्यांनी एस.आर.शंकरन व पॉल दिवाकर यांच्या सहकार्याने सफाई कर्मचारी आंदोलन ही संस्था सुरू केली. या संघटनेने हा प्रश्न धसास लावला. त्यांच्या या आंदोलनाने अनेकांना या नरकातून मुक्ती व पुनर्जन्म दिला, प्रतिष्ठा दिली. जन्माने तुम्ही अस्वच्छ आहात, कनिष्ठ आहात, तुम्ही तेच काम केले पाहिजे, असे सांगणाऱ्या समाजाविरोधात ते उभे राहिले, त्यामुळे पददलितांना सन्मानाने जगण्याचे बळ मिळाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 2:55 am

Web Title: bezwada wilson
Next Stories
1 अरुंधती घोष
2 प्रणव मिस्त्री
3 नीरज चोप्रा
Just Now!
X