28 January 2021

News Flash

नि. कर्नल नरेंद्र ‘बुल’ कुमार

उत्तुंग शिखरांवर लीलया चढाईचा अनुभव नरेंद्र कुमार यांना सियाचीनमधील लष्करी मोहिमेत कामी आला.

नि. कर्नल नरेंद्र ‘बुल’ कुमार

 

काराकोरम पर्वतरांगेतील भारताच्या ताब्यात असलेला अतिशय महत्त्वाचा प्रदेश म्हणजे सियाचीन. जगातील सर्वात उंचावरील बर्फाच्छादित युद्धभूमी. भारत त्यावर प्रभृत्व राखू शकला, ते केवळ कर्नल नरेंद्र ‘बुल’ कुमार यांच्या धाडसी कामगिरीमुळे. १९८४ मध्ये हा प्रदेश बळकावण्याचे पाकिस्तानचे मनसुबे कडाक्याच्या थंडीत धडक देऊन नरेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखालील तुकडीने उधळले. या गिर्यारोहक युद्धनायकाचे गुरुवारी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. नरेंद्र कुमार यांचा जन्म ८ जानेवारी १९३३ रोजी ब्रिटिशकालीन भारतातील रावळपिंडी (सध्या पाकिस्तानात) येथे झाला. भारतीय लष्करात ‘बुल कुमार’ या टोपणनावाने ते प्रसिद्ध झाले. या टोपणनावाची कथा रंजक आहे. भारतीय लष्कर प्रबोधिनीत पहिल्या बॉक्सिंग सामन्यात त्यांची गाठ त्यांच्यापेक्षा किती तरी उंच आणि धिप्पाड प्रतिस्पध्र्याशी पडली. तगडय़ा स्पर्धकाशी ते बैलाप्रमाणे भिडले. निकराने प्रयत्न करूनही त्यांना हार पत्करावी लागली. पण त्यांच्या खेळण्याच्या शैलीने सर्वाची मने जिंकली. तेव्हापासून कुठेही आडवातिडवा भिडणारा म्हणून त्यांना ‘बुल’ हे नाव पडले. हे टोपणनाव त्यांनी सर्वच लष्करी मोहिमेत सार्थकी लावले. भारतीय लष्करात नरेंद्र कुमार हे १९५० मध्ये दाखल झाले. प्रशिक्षणानंतर ते कुमाऊ रेजिमेंटमध्ये रुजू झाले. गिर्यारोहण, घोडेस्वारी, मुष्टियुद्धाची आवड त्यांनी लष्करी सेवेत जोपासली. नंदा देवी शिखर सर करणारे ते पहिले भारतीय ठरले. कांचनगंगा शिखरावर उत्तर-पूर्व दिशेच्या अवघड मार्गाने चढण्याचा सहसा कोणी विचार करत नाही; पण नरेंद्र कुमार यांनी तो केला. विचार करून न थांबता त्याच बाजूने शिखर गाठणारे ते पहिले भारतीय ठरले.

उत्तुंग शिखरांवर लीलया चढाईचा अनुभव नरेंद्र कुमार यांना सियाचीनमधील लष्करी मोहिमेत कामी आला. पाकिस्तानी सैन्याने सियाचीनसह आसपासच्या भागात शिरकाव केल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन मेघदूत’ची आखणी केली. हिमालयात जून-जुलैपासून गिर्यारोहणाचा मोसम सुरू होतो. घुसखोरी रोखण्यासाठी दोन महिने प्रतीक्षा करणे शक्य नव्हते. कडाक्याच्या थंडीत हेलिकॉप्टरद्वारे नरेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखाली कुमाऊची तुकडी पोहोचली. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शत्रूवर हल्ला चढविला. पाकिस्तानी सैन्याला पराभूत करून सियाचीनवर ताबा मिळवला. सियाचीनचे सामरिक महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रात कायमस्वरूपी लष्कर तैनात ठेवण्याचे निश्चित झाले. त्यांच्या कामगिरीचा गौरव सियाचीनवरील महत्त्वाच्या लष्करी ठाण्यास ‘कुमार बेस’ असे नाव देऊन करण्यात आला. ३४ वर्षांच्या लष्करी सेवेनंतर ते निवृत्त झाले. त्यांना पद्मश्री, कीर्तिचक्र, अतिविशिष्ट सेवा पदक, तसेच अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांची धाडसी कामगिरी भारतीय लष्करास सदैव प्रेरणा देणारी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 12:01 am

Web Title: colonel narendra bull kumar profile abn 97
Next Stories
1 बालम केतकर
2 शम्सुर रहमान फारुकी
3 पं. सतीश व्यास
Just Now!
X