शिक्षण अर्धवट सोडून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावलेले अनेक जण आहेत. ऑस्कर विजेते चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथाकार कर्टिस हॅन्सन अशाच अवलियांपैकी एक. सिनेनियतकालिकांत मुक्त छायाचित्रकार होण्याच्या वेडापायी त्यांनी शाळा सोडली खरी, पण घडले वेगळेच. काही वर्षांनंतर छायचित्रणाऐवजी ते हॉलीवूडमध्ये भयपट लिहू लागले आणि पुढे अनेक दर्जेदार चित्रपटांवर त्यांनी आपली नाममुद्रा उमटवली.

१९७० मध्ये एच पी लव्हक्राफट या लेखकाच्या ‘द डनविच हॉरर’ या लघुकथेवर आधारित चित्रपटाचे सहलेखक म्हणून ते सिनेसृष्टीत आले. त्यानंतर १९७३ मध्ये आला ‘स्वीट किल’ हा भयपट. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी हॅन्सन यांनी पेलली होती. हा चित्रपट गाजल्याने त्यांचे नाव चर्चेत आले. इलियट गोल्ड आणि ख्रिस्तोफर प्लमर जोडीचा ‘द सायलन्ट पार्टनर’सह पुढे १९८० ते ९० च्या दशकात त्यांनी अनेक विनोदी त्याचबरोबर हाणामारीचे चित्रपटही केले. ‘द हॅण्ड दॅट रॉक्स द क्रेडल’, ‘रिव्हर वाइल्ड’ हे चित्रपट तिकीटबारीवरही कमालीचे यशस्वी ठरले.

तीन पोलीस अधिकारी एका खुनाचा छडा लावण्याचा कसोशीने प्रयत्न करीत असताना पोलीस दलातील काही अधिकारीच भ्रष्ट असल्याचे समोर येते, अशा कथानकाभोवती गुंफलेला ‘एल ए कॉन्फिडेन्शियल’ हा हॅन्सन यांचा चित्रपट समीक्षकांनी उचलून धरला. केविन स्पेसी, रसेल क्रो, किम बसिंगर असे तगडे कलाकार असलेल्या या चित्रपटाला सवरेत्कृष्ट चित्रपट, सवरेत्कृष्ट दिग्दर्शक अशा नऊ विभागांत ऑस्करचे नामांकन मिळाले होते! त्यांपैकी पटकथा आणि सहअभिनेत्रीचे पारितोषिक या चित्रपटाने पटकावले. हॅन्सन आणि ब्रायन हेलगेलॅण्ड यांना हे पारितोषिक विभागून मिळाले. अल्फ्रेड हिचकॉक आणि निकोलस रे यांचा आपल्यावर खूप प्रभाव असल्याचे हॅन्सन नेहमी सांगत. रे यांचे चित्रपट मी एकांतात बसून अनेक वेळा पाहिले. ‘एल ए कॉन्फिडेन्शियल’ हा चित्रपट बनवताना त्याचा मला खूप लाभ झाला, असे एका मुलाखतीत त्यांनी प्रांजळपणे सांगितले होते. एमिनेम याला सवरेत्कृष्ट गायकाचा ऑस्कर पुरस्कार मिळवून देणारा हॅन्सन यांचा ‘एट माइल’ हा आणखी एक उल्लेखनीय चित्रपट. २००८ मधील आर्थिक मंदीने सबंध जगाला हादरा दिला. अमेरिकाही त्यातून सुटली नाही. या अरिष्टातून बाहेर पडण्यासाठी वॉल स्ट्रीट आणि अमेरिकेने कसा संघर्ष केला याचे विश्लेषण अ‍ॅण्ड्रय़ू रॉस सॉर्किन यांनी ‘टू बिग टु फेल’ या पुस्तकात केले होते. २०११ मध्ये त्यांनी याच नावाने निघालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. पॉल गिमट्टी, विल्यम हर्ट, जेम्स वूड्स यांच्यासारख्या मुरब्बी अभिनेत्यांमुळे हाही चित्रपट सर्वत्र चर्चिला गेला. हॅन्सन यांना नंतर स्मृतिभ्रंशाचा विकार जडल्याने चित्रपट क्षेत्रातून ते निवृत्त झाले. मंगळवारी वयाच्या ७१व्या वर्षी त्यांना झोपेतच मृत्यूने गाठले आणि हॉलीवूडमधील एक पर्व संपले..