मुंबईतील कुर्ला उपनगर हे १९६०च्या दशकात गरीब, गिरणी व औद्योगिक कामगारांची वस्ती होते. अशा काळात शिक्षणाच्या प्रसारासाठी महाराष्ट्र विद्या विकास मंडळ या संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू करून मुंबईतल्या प्रथितयश खासगी शाळांच्या तोडीचे शिक्षण गरीब मुलांनाही उपलब्ध करून देण्याचे अवघड कार्य करणारे द. ना. तथा भाऊ सामंत (९४) यांचे शनिवारी निधन झाले आणि ५० वर्षांच्या वसाहतीच्या इतिहासातील शिक्षणाशी संबंधित एक पर्व संपले. वेंगुर्ला तालुक्यातील कोंड या गावातून १९४०च्या दशकात मुंबईत आलेल्या दत्तात्रय नारायण सामंतांचे घराणे शिक्षणामध्ये अव्वल असूनही घरच्या परिस्थितीमुळे त्यांनी मुंबई गाठली आणि आपले शिक्षण पूर्ण करतानाच स्वत:ची शाळा असावी हे स्वप्न उराशी बाळगले. साम्यवादी विचारसरणीचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यामुळेच तळागाळातल्या, कामगारांच्या मुलांना शिक्षणाची दारे उघडून देण्याचे ध्येय त्यांनी कायम बाळगले. कुर्ला, कांजूरमार्ग यांसारख्या गरीब वस्तीमध्ये त्यांनी शाळा उभी केली. वार्षिक स्नेहसंमेलन, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन या दिवशी मुलांना जेवण देणे, आषाढीला वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात दिंडी नेणे, दिल्लीला विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय संमेलनामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना सहभागी करणे आदी उपक्रमांद्वारे त्यांनी शाळेला जनमानसात मान्यता मिळवून दिली. खासगी संस्था असूनही सर्वसामान्यांना ती आपली शाळा वाटावी यासाठी त्यांनी अनेक कल्पक उपक्रम राबवले. स्थानिक पातळीपासून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. अनेक लेखकांना, मान्यवरांना त्यांनी शाळेमध्ये शिक्षक-विद्यार्थ्यांशी संवादाला आमंत्रित केले. शिक्षक-पालक आणि विद्यार्थी यांच्यातील संबंध सौहार्दाचे राहावेत यासाठीही उपक्रम राबविले. न्यू इंग्लिश स्कूल या कुल्र्यातील शाळेचे नंतर शां. कृ. पंतवालावलकर माध्यमिक विद्यालय असे नामकरण झाल्यावरही, आजही जुन्याच नावाने शाळा परिचित आहे. डॉ. दत्ता सामंत यांच्याशी नातेसंबंध असूनही राजकारणापासून लांब राहाणे त्यांनी पसंत केले. कुल्र्याच्या नेहरूनगर परिसरातील अनेक संस्थांमध्ये सहभाग घेऊन, सामाजिक-सांस्कृतिक जडणघडणीस त्यांनी हातभार लावला. नेहमी लोकांच्या गराडय़ात राहणाऱ्या सामंतसरांचे करोनामुळे अखेरचे अंत्यदर्शनही त्यांच्या कुटुंबीयांसह कोणालाही घेता आले नाही, ही सल अनेकांच्या मनात कायम राहिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 1, 2020 12:35 am