News Flash

डॉ. भवरलाल जैन

ओळख देणारी एकही व्यक्ती जवळपास नसल्याने तो तरुण सुमारे १५ किलोमीटर अंतर पायी चालत गेला.

डॉ. भवरलाल जैन

एकदा जळगाव जिल्ह्य़ातील वाकोद या आपल्या जन्मगावाहून भाडय़ाने सायकल घेऊन पळसखेडे येथे जाण्याची वेळ त्या तरुणावर आली. सायकलवाल्याने त्यांना ओळख विचारली. ओळखीशिवाय भाडय़ाने सायकल मिळत नव्हती. ओळख देणारी एकही व्यक्ती जवळपास नसल्याने तो तरुण सुमारे १५ किलोमीटर अंतर पायी चालत गेला. तेव्हा ओळखीसाठी आसुसलेल्या या तरुणाने नंतर जिद्द आणि कष्ट करण्याच्या स्वभावामुळे अशी काही ओळख निर्माण केली की, अगदी भारताबाहेरही त्यांची ख्याती पसरली. ही व्यक्ती म्हणजे जळगावच्या जैन इरिगेशन आणि गांधीतीर्थचे संस्थापक डॉ. भवरलाल हिरालाल जैन ऊर्फ भाऊ!
ठिबक सिंचन यंत्रणेचा प्रचार व प्रसार करून शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आणणारे भाऊ म्हणजे शेतकऱ्यांमध्ये रमणारा माणूस.भाऊंनी १९७८ मध्ये एका शेती उत्पादनाच्या साहाय्यानेच आपल्या औद्योगिक कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. शेतांमध्ये पपई लागवड करण्यास त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यापासून मिळणाऱ्या ‘पपई दुधास’ त्यांनी हमी भावाची खात्री दिली. खरवडलेल्या विद्रूप पपयाची त्यांनी कँडी-टूटी-फ्रुटी बनविण्यासाठी खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांना एक नवीन उत्पन्नाचा मार्ग मिळाला. पपईपासून तयार केलेले ‘पपेन’ तीन हजार रुपये प्रति किलो या भावाने निर्यात केले. तेच भाऊंचे पहिले शेतीवर आधारित १०० टक्के निर्याताभिमुख असे औद्योगिक साहस ठरले. शेती सिंचनासाठी पीव्हीसी पाइप लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी वेगळीच शक्कल वापरली. गळतीमुळे वाया जाणाऱ्या पाण्याची तसेच बाष्पीभवनाने उडून जाणाऱ्या पाण्याची त्यामुळे बचत झाली. त्यानंतर १९८२ मध्ये तुषार आणि ठिबक सिंचनच्या क्षेत्रात इतिहासच घडला.
जगाच्या ठिबक नकाशावर भारताला क्रमांक दोनचे स्थान मिळवून देण्यात भाऊंचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी स्थापन केलेल्या केळी उती संवर्धन प्रयोगशाळेमुळे देशभरातील हजारो शेतकऱ्यांनी प्रत्येक घडाचे उत्पन्न सरासरी ११ किलोपासून थेट २३ किलोपर्यंत नेले. ‘ग्रँडनैन’ या नावांची उती संवर्धित रोपांची नवी जात व्यापारी तत्त्वावर वितरित करण्याचा पहिला मान त्यांच्याकडेच जातो. जैन उच्च तंत्र शेती संस्थानमध्ये शेतमालावर संशोधन विकास व प्रात्यक्षिके, प्रशिक्षण असे सर्व काही सुरू असते. एकाच छत्राखाली असलेले शेतीचे हे वैभव पाहण्यासठी दर वर्षी २० हजार शेतकरी जळगाव येथे भेट देतात. भाज्यांचे निर्जलीकरण आणि फळ प्रक्रिया कारखानेही भलीमोठी गुंतवणूक करून भाऊंनी उभे केले. एकीकडे शेतीवर आधारित उद्योग किंवा प्रकल्प उभारणीस बहुतांश धोका मानत असताना भाऊ यांचे सर्वच व्यवसाय शेती व शेतकऱ्यांशीच संबंधित आहेत. त्यांच्या या कार्यासाठी दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसह एकूण २६ पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यात २००८ मध्ये मिळालेल्या ‘पद्मश्री’चाही समावेश आहे. त्यांच्या निधनाने शेतकऱ्यांचा एक सच्चा मित्र हरपला आहे..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 3:38 am

Web Title: dr bhavarlal jain
Next Stories
1 हुबर्ट पी. यॉकी
2 डॉ. गोवर्धन मेहता
3 ज्यांफ्रँको रोसी
Just Now!
X