केनियासारख्या देशातील एका छोटय़ाशा गावात जन्मलेल्या या मुलाने नंतर विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक क्षेत्रांत नवप्रवर्तनाची क्रांती केली. त्याची सुरुवात त्याने बालपणीच केली होती. लेक व्हिक्टोरियाच्या काठावर वसलेल्या गावात पुरामुळे अन्नटंचाई निर्माण झाली असताना या मुलाने कॅसावा या नव्या पिकांची लागवड करण्याचा मार्ग ग्रामस्थांना दाखवला. सुरुवातीला विरोध झाला खरा, पण नंतर अन्नटंचाईचा प्रश्न कायमचा सुटला. त्यांचे नाव डॉ. कॅलेस्टस जुमा. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे शाश्वत विकासातील एक खंदा शिलेदार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

अगदी लहानपणापासूनच नवीन गोष्टींचा विचार करून त्यावर प्रयोग करण्याची सवय त्यांना होती. वयाच्या बाराव्या वर्षी ते रेडिओ व रेकॉर्ड प्लेअर दुरुस्त करीत असत. डॉ. जुमा हे हार्वर्ड केनेडी स्कूल येथे विज्ञान, तंत्रज्ञान व जागतिकीकरण प्रकल्पाचे संचालक होते. आंतरराष्ट्रीय विकास पद्धती या विषयाचे प्राध्यापक व व्यापक विषयांवर लेखन करणारे विद्वान असा त्यांचा लौकिक होता. तंत्रज्ञानाचा वापर गरिबांचे जीवन बदलण्यासाठी झाला पाहिजे असे त्यांना वाटत होते. संयुक्त राष्ट्रांच्या जैवविविधता जाहीरनाम्याचे ते कार्यकारी सचिव होते. त्यांनी नैरोबीत ‘आफ्रिकन सेंटर फॉर टेक्नॉलॉजी स्टडीज’ ही संस्था स्थापन केली. शाश्वत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर, असा या संस्थेचा हेतू आहे. कृषी उत्पादन वाढ, शैक्षणिक दर्जा, आर्थिक संपन्नता यात नेहमी मंत्री व सरकारमधील प्रतिनिधी त्यांचा सल्ला घेत असत. समाजमाध्यमांवरही त्यांनी अनेक अनुसारक मिळवले होते. एक  उत्तम शिक्षक म्हणूनही नावलौकिक त्यांनी मिळवला होता. २०१६ मध्ये त्यांनी लिहिलेले ‘इनोव्हेशन अ‍ॅण्ड इट्स एनेमीज’ हे पुस्तक गाजले, त्यात कुठल्याही नवीन तंत्रज्ञानाला नाके मुरडण्याच्या सामाजिक प्रवृत्तींवर टीका केली होती. गेली सहाशे वर्षे समाजात हेच चालत आले आहे व अजूनही आपण बदलायला वेळ घेतो, असे त्यांचे म्हणणे होते. ब्रिटनच्या ससेक्स विद्यापीठातून त्यांनी विज्ञान तंत्रज्ञान धोरण या विषयात पीएचडी केली होती. तंत्रज्ञान अभिनवता, जेनेटिक पेटंटिंग, हरित क्रांतीचा आफ्रिकेवरचा परिणाम यावर त्यांनी मोठे काम केले होते. योग्य पायाभूत सुविधा व धोरणे याशिवाय आफ्रिकेचा विकास शक्य नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. ‘इन लॅण्ड वुइ ट्रस्ट’, ‘दी न्यू हार्वेस्ट’, ‘दी जीन हंटर्स’ ही त्यांची पुस्तके गाजली. ‘द नेशन’ या मायदेशातील वृत्तपत्रांत त्यांनी सुरुवातीला विज्ञान तंत्रज्ञान प्रतिनिधी म्हणून काम केले होते. त्याकाळात असे काम करणारे ते पहिलेच विज्ञान पत्रकार होते. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात धोरणात्मक दिशा दाखवू शकतील असे थोडे लोक असतात. जुमा यांनी विविध समस्यांवर उत्तरे शोधण्यास केवळ आफ्रिकेलाच नव्हे तर जगालाही मदत केली.  त्या मोहिमेत त्यांना अनेक अडचणी आल्या, पण त्यामुळे त्यांनी शरणागती पत्करली नाही, उलट नव्या जोमाने नवप्रवर्तनाचा स्वीकार करण्यासाठी लोकांची मानसिक घडण तयार केली. हे काम सोपे नव्हते कारण एखादी गोष्ट दुसऱ्याच्या फायद्याची असूनही ती त्याला पटवून देताना आधी नवतंत्रज्ञानाचे बारकावे माहिती असावे लागतात. त्यात ते कुठेही कमी पडले नाहीत, त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या नवसंकल्पनांनाही समाजाने स्वीकारले ते कायमचेच. त्यांच्या व्यक्तित्वाचा विशेष म्हणजे त्यांना अहंगंड मुळीच नव्हता. कुठल्याही विषयाची आंतरिक दृष्टी, आशावाद, विनोद यांचा मिलाफ त्यांच्या व्यक्तित्वात होता. सतत खळखळून हसण्याचा त्यांचा आवाज ही त्यांची एक वेगळी ओळख होती. आता हे हास्य निमाले आहे.