रामन परिणामासाठी भारतीय वैज्ञानिक चंद्रशेखर व्यंकट रमण यांना भौतिकशास्त्रातील नोबेल मिळाले होते. पुण्याच्या आयसर या विज्ञान संशोधन संस्थेतील प्राध्यापक डॉ. जी. व्ही. पवनकुमार यांनी प्रकाशीय भौतिकशास्त्राचा अभ्यास करताना व्यापक स्वरूपाचा अभ्यास करून प्लास्मोनिक, नॅनोफोटॉनिक्स या क्षेत्रांत महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यासाठी त्यांना २०१५ मध्ये नासी-स्कॉप्स तरुण वैज्ञानिक पुरस्कार मिळाला होता व अलीकडेच त्यांना सीएसआयआरचा ‘स्वर्णजयंती’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्रकाश सूक्ष्म रचनांशी आंतरक्रिया करीत असतो. त्यातूनच सूक्ष्म रेणूंचे निरीक्षण करण्यात मदत होते. या निरीक्षणाच्या माध्यमातून नवीन औषधे, रोगांचा संसर्ग यांचा अभ्यास करून रोगनिदान व उपचार शक्य आहेत. त्यांच्या संशोधनाचा विषय हा जरी भौतिकशास्त्रातील असला तरी त्याचे उपयोग सजीवांच्या अभ्यासातही आहेत. रोगकारक रेणू, त्याचबरोबर औषधांचे रेणू, प्रदूषणास कारणीभूत ठरणारे सूक्ष्म कण यांचा रहस्यभेद प्रकाशाच्या मदतीनेच शक्य असतो. रामन विकिरण परिणाम हे त्यासाठी एक साधन असले तरी ते पुरेसे नाही, त्यामुळेच पवनकुमार यांनी अतिशय अचूकतेने अभ्यास करण्यासाठी त्यातील उणिवा दूर केल्या आहेत. सूक्ष्म खोबणीचा वापर करून त्यातील रेणूंचा अभ्यास करण्याची नवी पद्धत त्यांनी विकसित केली. एक-रेणवीय किंवा एकेरी नॅनोरचनेचा अभ्यास यामुळे शक्य झाला, जो एरवी शक्य नव्हता. अगदी मर्यादित जागेत रेणूंवर काय परिणाम होतो याचा अभ्यास प्रकाशीय अँटेनाच्या मदतीने करण्यातही त्यांना यश आले आहे. चांदीची नॅनो तार व सोन्याची पातळ पट्टी यांच्या मदतीने यात नॅनो म्हणजे अब्जांश आकाराची खोबण तयार केली जाते. त्यात रेणूंचे वर्तन हे मुक्तरेणूंपेक्षा वेगळे असते. आतापर्यंत रामन परिणामातील लहरी इतर रेणवीय विकिरणांतून वेगळे काढणे फार खर्चीक होते, ती पद्धत त्यांनी सोपी व स्वस्त केली आहे, ही त्यांची सर्वात मोठी कामगिरी. या संशोधनाचा उपयोग मोबाइल फोनमधील सूक्ष्म घटकांमध्ये होणार असून त्यातून नवे संवेदक विकसित करता येतील. आपल्या केसाच्या एक हजारपट सूक्ष्म रेणूंचे निरीक्षणही यात साध्य होणार आहे त्यातून औषधनिर्माणासह रोगनिदानात प्रगती होऊ शकते.  विशेष म्हणजे त्यांनी शोधलेल्या फुरियर प्लेन स्कॅटरिंग सूक्ष्मदर्शकामुळे रामन परिणामाचे उपयोग शतगुणित झाले आहेत. अगदी स्पंदनशील रेणूंचे निरीक्षणही त्यात शक्य असते. कोलॉइड, लिक्विड क्रिस्टल यांच्याबरोबरच मानवी पेशी, अर्धपारपटले, उती यांचा अभ्यास करण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होणार आहे.