जगातील किमान ४१ टक्के लोक नद्यांच्या खोऱ्यांमध्ये असलेल्या प्रदेशात राहतात. नदीकाठी राहणाऱ्या लोकांचे तिच्याशी एक नाते असते. तेथील परिसंस्था त्यांना माहीत असते. अचानक एके दिवशी सरकारी फतवा निघतो, नदीवर धरण बांधायचंय.. मग त्या भागातील सगळं जीवनच अस्ताव्यस्त होतं. जे लोक असे फतवे काढतात त्यांनी कागदोपत्री काहीतरी योजना तयार केलेल्या असतात. त्यात स्थानिक परिसंस्था व तेथील लोकांवर काय दुष्परिणाम होतील याचा विचार कधीच केलेला नसतो. मग उभा राहतो नदी व तिच्या लेकरांना वाचवण्याचा लढा. असाच एक लढा केरळात डॉ. लता अनंत लढत होत्या. तो लढा होता चेल्लाकुडी धरणाला विरोधाचा. त्यांनी निकराने या लढाईत मूळ निवासी लोकांची बाजू लावून धरली होती. लता अनंत यांचे नुकतेच निधन झाले.

त्रिचूर येथील रिव्हर रिसर्च सेंटर व चेल्लाकुडी पुझा संरक्षण समिती या दोन संस्था त्यांनी स्थापन केल्या होत्या. पहिला भगीरथ प्रयास सन्मान त्यांना मिळाला तो या लढय़ामुळेच. समाज, राजकीय नेते, सरकारी संस्था यांच्यात मतपरिवर्तन करण्यासाठी त्यांनी नद्यांविषयीच्या संशोधनाचा जो वापर केला त्याला तोड नव्हती. देशात नद्यांचे संवर्धन सर्वाच्या मतक्याने करण्याचे त्यांचे धोरण होते. त्यात त्या बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाल्या. लता या कृषी शास्त्रज्ञ होत्या, त्यांनी कृषी विषयात डॉक्टरेट केली होती. एकदा एका निसर्ग शिबिराच्या निमित्ताने १९८९च्या सुमारास त्या सायलेंट व्हॅली नॅशनल फॉरेस्टला गेल्या होत्या त्या वेळी डॉ. सतीश चंद्रन नायर त्यांच्यासमवेत होते. त्या वेळी त्यांच्या असे लक्षात आले, की या जंगलातील अनेक नद्यांचे प्रवाह आता थांबले आहेत. त्याच वेळी लता यांच्या आयुष्याचे ध्येय ठरले, ते होते नद्यांचे संवर्धन. नंतर त्यांनी स्वत: मुलांची निसर्ग शिबिरे घेऊन त्यांना केरळातील देवभूमीचे दर्शन घडवताना नकळत त्यांच्या मनात निसर्गप्रेमाची बीजे पेरली.

१९९८ मध्ये चेल्लाकुडीवरील अथिरापल्ली धरणाची घोषणा दिल्लीतून झाली तेव्हा त्यांना धक्काच बसला, कारण त्यात पर्यावरण, नदीसंवर्धन व तेथील लोक यांच्या हिताचा कुठलाच विचार नव्हता. त्याविरोधात त्यांनी अखेपर्यंत लढा दिला व त्यात त्यांना यशही आले.

नदी जर प्रवाही राहिली नाही तर मानवी जीवनाचा प्रवाहही संपू शकतो हे त्यांना माहिती होते. त्यामुळेच त्यांनी नद्यांचे पुनरुज्जीवन, नदी खोरे व्यवस्थापन असे अनेक विषय अग्रक्रमाने हाताळले. चेल्लाकुडी नदीला अथिरापल्ली जलविद्युत प्रकल्पापासून वाचवण्याची लोकचळवळ त्यांनी उभी केली. ‘कमिटी ऑफ इंटरनॅशनल रिव्हर्स’ या अमेरिकेतील संस्थेच्या त्या सदस्य होत्या, ‘ट्रॅजेडी ऑफ कॉमन्स- द केरळा एक्सपिरियन्स इन रिव्हर लिंकिंग’ या पुस्तकाच्या त्या सहलेखिका.

नदी व त्यांच्या भोवतीचा लोकांचा नसर्गिक अधिवास यांचे एक नाते असते. धरणांमुळे त्यावर आघात होतो, त्यामुळे परिसंस्थाच धोक्यात येते असे त्यांचे म्हणणे होते. केरळमध्ये वाळू उत्खनन वर्षांतून काही काळ बंद ठेवण्याची कल्पना केरळ सरकारच्या गळी उतरवण्यात त्या यशस्वी झाल्या होत्या. पश्चिम घाटातील नाहीशा होत चाललेल्या जैवविविधतेची त्यांना तेवढीच काळजी होती. मुन्नार मरायूरच्या भागात गव्यांचा संसर्गाने मृत्यू होत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यांनी दाखल केलेल्या याचिकांमुळे चेल्लाकुडी नदीवरचा अथिरापल्ली धरण प्रकल्प तूर्त तरी रोखला गेला आहे.

पंचवीस वष्रे त्यांनी हा लढा सुरू ठेवला. वयाच्या एकावन्नाव्या वर्षी कर्करोगाने त्या गेल्या, त्यांच्या जाण्याने खळाळत वाहणाऱ्या एका नदीचा प्रवाह कायमचा थांबला आहे.