19 September 2020

News Flash

डॉ. नोएल रोझ

रोझ यांनी या प्रकारच्या रोगांवर संशोधन सुरू केले तेव्हा त्यांना लोकांनी वेडय़ात काढले

डॉ. नोएल रोझ

करोनामुळे सध्या मानवी शरीराच्या प्रतिकारशक्तीचा बोलबाला आहे; पण मानवी शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्याइतकेच तिचे नियंत्रणही महत्त्वाचे असते. प्रतिकारशक्ती प्रणाली बेकाबू झाली तर ती स्वत:च्याच निरोगी पेशींनाही मारू शकते. या  स्वप्रतिकारशक्तीने अनेक रोग होतात त्याला ‘ऑटोइम्यून डिसीज’ असे म्हणतात. ही संकल्पना प्रथम १९५० च्या दशकात डॉ. नोएल आर. रोझ यांनी मांडली. ‘ऑटोइम्युनिटी’च्या या संशोधकाचे नुकतेच निधन झाले.

रोझ यांनी या प्रकारच्या रोगांवर संशोधन सुरू केले तेव्हा त्यांना लोकांनी वेडय़ात काढले. पण अखेर, आपल्याच पेशी आपल्याच शरीरातील दुसऱ्या पेशींच्या शत्रू बनू शकतात हे त्यांनी सिद्ध केले. त्यांनी यावर आधारित किमान ८० रोग शोधून काढले. यात टाइप १ मधुमेह, हृदयाचा संधिवात या रोगांचा समावेश आहे. किमान दोन कोटी अमेरिकी लोकांना तरी या रोगांनी ग्रासलेले आहे. रोझ हे बफेलो विद्यापीठातील  वाइटबस्की प्रयोगशाळेत वैद्यकीय संशोधक होते. त्यापूर्वी पॉल एलरिच यांनी ‘हॉरर ऑटोटॉक्सिकस’ असा शब्द वापरला होता त्याला स्वविषीकरण म्हणतात. डॉ. रोझ यांनी ‘थायरोग्लोब्युलिन’ या प्रथिनाचे प्रयोग अनेक प्राण्यांवर केले. सशात हे प्रथिन टोचल्यानंतर त्या विरोधात प्रतिपिंड तयार झाले खरे, ते होणे अपेक्षित नव्हते कारण हे प्रथिन ससे व माणसाच्या शरीरातही असते. तरी त्यावर हल्ला केला गेला. याचा अर्थ प्रतिकारशक्ती प्रणालीने आपल्याच पेशींना परके मानले. रोझ यांच्या प्रयोगातून जे निष्कर्ष आले ते एलरिच यांच्या संशोधनापेक्षा वेगळे होते, पण रोझ यांचे संशोधन कुणीच मान्य करायला तयार नव्हते. त्यांनी १९५६ मध्ये याबाबत लिहिलेला शोधनिबंध अविश्वासाने नाकारला गेला, पण नंतर अनेक वर्षांनी ब्रिटिश संशोधकांनी केलेल्या प्रयोगात तेच दिसून आले. स्वयंप्रतिकारशक्तीने काही रोग होऊ शकतात हे जगाला शेवटी मान्य करावे लागले. हाशिमोटो डिसीज, ग्रेव्हज डिसीज (हायपर थायरॉडिझम) हे रोग याच कारणाने होतात हे त्यांनी दाखवून दिले. या संशोधनाने वैद्यकशास्त्रात एक नवीन शाखा खुली झाली.

नोएल यांचा जन्म स्टॅमफर्ड (कॉन) येथील. त्यांचे वडील डॉक्टर होते. येल विद्यापीठातून प्राणीशास्त्रात पदवी घेतल्यानंतर त्यांनी पेनसिल्वानिया विद्यापीठातून डॉक्टरेट घेतली. त्यांनी ९०० शोधनिबंध लिहिले, तर २० पुस्तके संपादित केली. त्यातील ‘द ऑटोइम्यून डिसीजेस’ या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. २०१५ मध्ये ते जॉन हॉपकिन्समधून निवृत्त झाल्यावर मॅसॅच्युसेट्सच्या ‘एमआयटी’त त्यांनी अखेपर्यंत काम केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2020 12:01 am

Web Title: dr noel rose profile abn 97
Next Stories
1 म. अ. मेहेंदळे
2 गोपालस्वामी कस्तुरीरंगन
3 सयीदा खानम
Just Now!
X