सध्या करोना प्रतिबंधक लशींबाबत वेगवेगळ्या बातम्यांनी आशा-निराशेचे हिंदोळे सुरू आहेत, पण फायझर कंपनीची लस लवकरात लवकर येणार या सुवार्तेने सगळ्यांच्याच आशा पल्लवित झाल्या. या लशीसाठी पडद्यामागे राहून ज्यांनी काम केले ते वैज्ञानिक आहेत डॉ. उगुर साहीन व डॉ. उझ्लेम तुरेसी. हे दोघे पती-पत्नी आहेत. दोघेही तुर्कस्तानातून जर्मनीत आलेले स्थलांतरित. या दाम्पत्याने कर्करोग व साथरोगांच्या संशोधनार्थ आपले जीवन वाहून दिले आहे. कर्करोगावर प्रतिकारशक्तीच्या माध्यमातून मात करण्यासाठी त्यांनी व्यक्तीविशिष्ट उपचारपद्धती तयार केल्या आहेत. साहीन (वय ५५) व तुरेसी (वय ५३) यांनी २००८ मध्ये ‘बायोएन्टेक’ कंपनी एका जर्मन सहकाऱ्याच्या मदतीने स्थापन  केली. जर्मनीतील पहिल्या दहा श्रीमंतांत गणना असूनही साहीन हे अजूनही दुचाकीवर कंपनीत येतात. त्यांच्या कंपनीचे मूल्य आहे २१.९ अब्ज डॉलर्स. त्यांनी करोनावर यापूर्वी कधीच न वापरलेल्या आरएनए किंवा एमआरएनए तंत्रज्ञानावर लस तयार केली. दोघांनी ‘गिनिमेड फार्मास्युटिकल्स’ कंपनी २००१ मध्ये स्थापन केली, या कंपनीत त्यांनी कर्करोगाशी लढणारे प्रतिपिंड तयार केले होते, पण ती कंपनी त्यांनी २०१६ मध्ये विकली. साहीन जर्मनीत कलोनला आले त्या वेळी ते चार वर्षांचे होते. त्यांचे वडील स्थानिक फोर्ड कारखान्यात काम करीत होते. त्यांना फुटबॉलची विशेष आवड. स्थानिक चर्चमधून आणलेल्या विज्ञानाच्या पुस्तकांमुळे ते या शाखेकडे वळले. तुर्की डॉक्टरची कन्या असलेल्या तुरेसी यांच्याशी त्यांची ओळख झाली. तुरेसी यांनी वडिलांच्या रुग्णालयात नन म्हणजे जोगिणींना समाजसेवा करताना पाहिले होते. त्यामुळे समाजसेवेचे संस्कार त्यांच्यावर झाले.

शैक्षणिक कारकीर्दीतच साहीन व तुरेसी एकमेकांचे जीवनसाथी बनले. त्यांच्या आवडीचा एक समान धागा होता तो म्हणजे कर्करोग संशोधन. त्यांनी विवाहाची पूर्वतयारीही प्रयोगशाळेतच केली इतके ते कार्यमग्न.

जानेवारीत वुहानमध्ये करोनाचा प्रसार झाल्यानंतर साहीन यांनी ‘लॅन्सेट’मधील एक शोधनिबंध वाचून, कंपनीतील ४०० संशोधक-कर्मचाऱ्यांना लस तयार करण्यासाठी आराखडा तयार करून दिला. रायबोन्यूक्लिक आम्लांवर (आरएनए) थेट परिणाम करणारे ‘एमआरएनए’ तंत्र लशीसाठी कसे वापरता येईल याचे विवेचन त्या आराखडय़ात होते. बायोएन्टेकचे यश म्हणजे विज्ञान, नवप्रवर्तन व जागतिक सहकार्य यांचा सुरेख मेळ आहे, असे मत या दोघांनी व्यक्त केले. त्यात कुठलाही अभिनिवेश नव्हता, हे विशेष.