पश्चिम बंगालमधील सुंदरबनच्या खारफुटीच्या जंगलांसाठी गेली अनेक वर्षे एकांडय़ा शिलेदारासारखे लढणारे तुषार कांजिलाल हे हाडाचे पर्यावरण कार्यकर्ते होते. टागोर व गांधी यांच्या संकल्पनांवर आधारित असे अनेक नवनवीन प्रयोग त्यांनी या क्षेत्रात केले. त्यांच्या निधनाने सुंदरबनचा कैवारी काळाच्या पडद्याआड गेला आहे. टागोर सोसायटी फॉर रुरल डेव्हलपमेंट या स्वयंसेवी संस्थेतून कांजिलाल यांनी सुंदरबनच्या परिसरातील वीस लाख लोकांचे जीवन सुसह्य़ केले. १९७५ पासून त्यांनी सुंदरबनचा लढा हाती घेतलाच, पण महिला सहकारी संस्था, कृषी संशोधन केंद्र, पशुसंवर्धन केंद्र असे अनेक उपक्रम तेथील लोकांच्या चरितार्थासाठी सुरू  केले. कांजिलाल हे रंगबेलिया बेटावर एका स्थानिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले तेव्हापासून सुंदरबन हेच त्यांचे कार्यक्षेत्र ठरून गेले. ते केवळ शिक्षक उरले नाहीत, त्यांनी सामान्य लोकांना हाताशी धरून सूक्ष्म पातळीवर विकासाचे प्रयोग केले. ते कमालीचे यशस्वी झाले व तेथे पाटबंधारे व्यवस्था विकसित झाल्या. ते अर्थशास्त्राचे पदवीधर. १९६७ पर्यंत ते राजकारणात सक्रिय होते, पण नंतर तीच संघटनकौशल्ये त्यांनी समाजविकासासाठी कामी आणली. कोलकात्यातून रंगबेलियात आल्यानंतर त्यांच्यातला सामाजिक कार्यकर्ता जागा झाला. त्यांना परिसंस्थेचे खूप चांगले ज्ञान होते. त्यांचा जन्म सध्या बांगलादेशात असलेल्या नोआखालीत १ मार्च १९३५ रोजी झाला. कांजिलाल कुटुंबीय स्वातंत्र्यापूर्वीच पश्चिम बंगालमध्ये स्थलांतरित झाले. कोलकाता व वर्धमान (बरद्वान) येथे त्यांचे बालपण व तरुणपण गेले. मार्क्‍सवादाकडे आकर्षित झाल्यानंतर अंगात कार्यकर्ता संचारल्याने त्यांचे शिक्षण वेळोवेळी खंडित होत गेले. रंगबेलियात स्थायिक झाल्यानंतर तेथे पिण्याचे पाणी, पक्के रस्ते, आरोग्य सेवा काही नव्हते. पण ‘मास्टरमोशाय’ कांजिलाल यांनी शिक्षणाबरोबरच हे कामही हाती घेतले. तेथे शिक्षणाला उत्तेजन दिले शिवाय इतर सोयीसुविधांवर भर दिला. मात्र हे होताना, कांजिलाल व त्यांच्या पत्नीने अनेक रात्री सापाच्या भीतीने जागून काढल्या.

सुंदरबन भागात गेल्यानंतर ते टागोरांच्या विचारांनी भारावले होते. जयप्रकाश नारायण व पन्नालाल दासगुप्ता यांचाही आदर्श होता. पर्यावरण क्षेत्रात त्यांनी नंतर झोकून दिले. सुंदरबनची खारफुटी जंगले वाचवण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. त्यावर त्यांनी ‘हू किल्ड सुंदरबन्स’ हे इंग्रजी पुस्तक, तसेच बंगाली भाषेत अनेक पुस्तके लिहिली. शिवाय आघाडीची नियतकालिके व वृत्तपत्रांतून तेथील पर्यावरण व लोक यावर लेखन केले. खारफुटीची जंगले व आधुनिक जग यांना जोडणारा दुवा म्हणून त्यांनी काम केले. सुंदरबनच्या लोकांसाठी सुरू केलेल्या लढय़ाला त्यांनी मोठा आयाम दिला. त्यांना १९९६ मध्ये ‘पद्मश्री’ व २००८ मध्ये जमनालाल बजाज पुरस्काराने गौरवण्यात आले होते. आज रंगबेलियात बँक, सरकारी कार्यालये, शाळा आहे, हा भाग गजबजलेला आहे. आता या भागाला सुसज्ज अत्याधुनिक रुग्णालय हवे आहे.. हा कायापालट घडवून आणला तो कांजिलाल मास्तरांनी! ते गेले तरी त्यांच्या स्मृतिगंधाने सुंदरबनचा सगळा परिसर भारलेला राहील.