रूढार्थाने एस्थर एम्वांगा या काही अनेक शिष्य घडविणाऱ्या ज्येष्ठ संशोधक किंवा अनेक पुरस्कार, सन्मान मिळवणाऱ्या मान्यवर विद्वान नव्हत्या. त्या दिशेने त्यांची कारकीर्द आता कुठे बहरू लागली होती. वयाच्या अवघ्या ५३ व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याची वार्ता परवाच्या शनिवारी (५ ऑक्टोबर) आली. तरीदेखील ‘वन-धोरणांना मानवी चेहरा देणारी एक संशोधक हरपली’ असे आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका अशा तीन खंडांतील संशोधक मंडळींना या निधनवार्तेने का वाटले? याचे कारण एस्थर यांनी केलेल्या कामात शोधावे लागते.

जंगलांचे, वनांचे खासगीकरण हे समन्यायी नसल्याचे अभ्यासान्ती सिद्ध करण्याचे काम तर एस्थर यांनी केलेच; पण बदलत्या काळात, वन-अवलंबी लोकसंख्या वाढत असताना जंगलातच राहून उदरनिर्वाह चालवण्याची पिढय़ान्पिढय़ांची पद्धत कायम राखण्यासाठी काय करावे लागेल, याचाही अभ्यास केला. स्त्रियांना वनजमीन-हक्कांमध्ये प्राधान्य दिले पाहिजे, हा त्या अभ्यासाचा प्रमुख निष्कर्ष महत्त्वाचा ठरला. हे निष्कर्ष नुसतेच शोधपत्रिकांमध्ये छापून न थांबता, एस्थर यांनी धोरणकर्त्यांशी लोकांचा संवाद घडवून आणण्याचे आणि लोकांच्या आकांक्षांना वन-धोरणांमध्ये स्थान मिळवून देण्याचे काम सुरू ठेवले होते.

अभ्यासक म्हणून त्यांचा दबदबा होताच. सन २००९ मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या एलिनॉर ओस्ट्रोम यांची पट्टशिष्या, ही एस्थर यांची एक ओळख होती. नैरोबी या केनियाच्या राजधानीनजीक जन्मलेल्या एस्थर यांनी त्याच शहरातील केन्याटा विद्यापीठातून वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र या विषयांतील पदवी घेतली. त्यानंतर अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी त्या गेल्या. या पदव्युत्तर पदवीसाठीचा एक भाग म्हणून त्यांनी लिहिलेला शोधनिबंध मसाई जमातीच्या सामूहिक मालकीच्या वनजमिनींचे पट्टे (मालकीहक्क) कुटुंबप्रमुखाला देण्याच्या फसलेल्या प्रयोगाची भेदक चिकित्सा करणारा होता. ‘आता मसाईंना कर्जे मिळू शकतील..’ अशी ‘सकारात्मक’ भलामण करून सामूहिक मालकीचे तत्त्व धुडकावले गेल्यावर या जंगलांची फरफट सुरू झाली होती. याच विषयाच्या सखोल आणि तौलनिक अभ्यासावर त्यांनी पीएच.डी. मिळविली आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या पर्यावरण अभ्यासकेंद्रात (ओस्ट्रोम यांच्या मार्गदर्शनाखाली) त्या पोस्टडॉक्टरल फेलो म्हणून अभ्यास करू लागल्या. वनजमिनींवरील पारंपरिक हक्क डावलून समन्यायी वाटप होऊ शकते का, हा मुद्दा या काळात त्यांनी धसाला लावला. गेली दहा वर्षे ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल फॉरेस्ट्री रिसर्च (सी-फॉर)’ या संस्थेतर्फे त्यांनी पेरू, निकाराग्वा, इंडोनेशिया, टांझानिया आदी ठिकाणी अभ्यासू सामाजिक कार्य केले. या संस्थेच्या केनियातील केंद्राच्या त्या प्रमुख होत्या.