गोपालस्वामी कस्तुरीरंगन यांच्या व्यक्तिमत्त्वाचे माजी मध्यमगती गोलंदाज, प्रशासक आणि क्युरेटर असे अनेक पैलू होते. परंतु क्रिकेट सामन्याचे नाटय़ ज्या रंगभूमीवर रंगते, त्या खेळपट्टीवरील कार्य अधिक मोलाचे. मैदानांची परंपरागत निगा राखणारे ते त्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे ‘क्युरेटर’ म्हणून त्यांचा विशेष लौकिक होता.

देशाने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४८-४९मध्ये कस्तुरीरंगन यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. १९६२-६३ पर्यंतच्या रणजी कारकीर्दीतील ३६ सामन्यांत २२.०२ च्या सरासरीने त्यांनी ९४ बळी मिळवले. गोलंदाजीच्या वेगळ्या शैलीमुळे ते सहज लक्ष वेधायचे. कर्नाटक राज्यस्थापनेआधी म्हैसूरचे ते प्रतिनिधित्व करायचे आणि त्यांनी काही वर्षे नेतृत्वही सांभाळले होते. याच कामगिरीच्या बळावर १९५२मध्ये त्यांची भारतीय संघात निवड झाली होती! परंतु वैयक्तिक कारणास्तव किंवा मांडीच्या दुखापतीमुळे ती संधी हुकली. हे शल्य त्यांना बोचणारे होते, तरी निवृत्तीनंतर अन्य मार्गानी त्यांनी भारतीय क्रिकेटची अविरत सेवा केली.

कर्नाटक क्रिकेट मंडळामध्ये कस्तुरीरंगन यांनी उपाध्यक्षपदासह अनेक पदे व जबाबदाऱ्या सांभाळल्या. १९७३मध्ये कर्नाटकने मुंबईची मक्तेदारी झुगारत ईरापल्ली प्रसन्ना यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच रणजी करंडक जिंकला. त्यावेळी ते निवड समिती सदस्य होते. स्थानिक क्रिकेटमध्ये कस्तुरीरंगन हे प्रसन्नाचे पहिले कर्णधार. त्या पदार्पणीय सामन्यात या द्वयीने एकूण नऊ बळी  मिळवण्याची किमया साधली होती.

कस्तुरीरंगन यांचे वडील कृषी अभ्यासक. त्यांची अनेक पुस्तकेही प्रकाशित आहेत. बागायतीचे ज्ञान कस्तुरीरंगन यांनी क्रिकेटच्या मैदानांवर उपयोगात आणले. १९९७मध्ये कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रथमच मैदाने आणि खेळपट्टय़ा समिती स्थापना केली. कपिल यांच्यानंतर तिचे  अध्यक्षपद कस्तुरीरंगन यांच्याकडे आल्यावर त्यांनी व्यावसायिकपणे आपल्या ज्ञानाचा उत्तम उपयोग केला. खेळपट्टीसाठी महत्त्वाचे घटक मानल्या जाणाऱ्या माती, गवत, खत यांचे अन्य क्युरेटर्सना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. ऐंशी आणि नव्वदीच्या दशकांमध्ये भारतीय खेळपट्टय़ांवर कस्तुरीरंगन यांचा विशेष प्रभाव होता. बेंगळूरुचे एम. चिन्नास्वामी स्टेडियम व राजिंदर सिंग इन्स्टिटय़ूट या खेळपट्टय़ा त्यांच्या कौशल्याचे प्रतीक मानल्या जातात. खेळपट्टय़ांविषयी दोन पुस्तकेही त्यांनी लिहिली.   ‘बीसीसीआय’शी मतभेदांमुळे त्यांनी  २००३ मध्ये पद सोडले. पुढे ‘बीसीसीआय’ कडून क्युरेटरच्या परीक्षाही घेतल्या जाऊ लागल्या. ‘क्युरेटर’पदाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे त्यांचे कार्य भारतीय क्रिकेटसाठी दिशादायी आहे.