सैन्य तुकडय़ांची कमतरता, उपकरणांचा अभाव आणि फारसा वेळ हाती नसताना जगातील सर्वाधिक उंचीच्या सियाचीन क्षेत्रातील पाकिस्तानी सैन्याचे आक्रमण परतवून, तेथे तिरंगा फडकावणारे लेफ्टनंट जनरल प्रेमनाथ तथा पी. एन. हून (निवृत्त) यांची निधनवार्ता सोमवारी आली. बर्फाच्छादित सियाचीन हा सामरिक दृष्टीने भारतासाठी अतिशय महत्त्वाचा भाग. आपण आजही तो राखून आहोत, याचे श्रेय हून यांच्या मेघदूत मोहिमेवेळीच्या युद्धकौशल्यात आहे. सर्वोत्कृष्ट सैनिक कसा असतो, हे हून यांनी त्या मोहिमेचे नेतृत्व करताना सिद्ध केले. सियाचीनवर ताबा घेण्याचे पाकिस्तानचे मनसुबे उधळले. उणे ५० ते ६० अंश तापमानात उत्तुंग पर्वतांवर जाऊन विजय मिळविणे सोपे नव्हते. सर्वाधिक उंचावरील युद्धभूमीवर लढली गेलेली अशा प्रकारची जगातील ती पहिलीच लढाई होती. भारतीय सैन्याने एप्रिल १९८४ मध्ये मेघदूत मोहीम सुरू केली. सियाचीनची भौगोलिक रचना अशी आहे की, भारताच्या बाजूने सरळ वर जाणारी चढण. पाकिस्तानच्या बाजूकडून उंची तुलनेत कमी. या स्थितीत हून यांनी पाकिस्तानी सैन्याला पिटाळले. आपले लक्ष्य काय आहे हे ओळखून प्रतिकूल स्थितीत ते गाठण्याची जबरदस्त इच्छाशक्ती ही हून यांच्याकडून मिळालेली सर्वात मोठी संपत्ती आणि शिकवण असल्याचे त्यांच्यासोबत काम करणारे निवृत्त लष्करी अधिकारी सांगतात.

चार दशकांच्या लष्करी सेवेत हून यांनी अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली. त्यांचा जन्म १९२९ मध्ये फाळणीपूर्व भारतातील अबोटाबाद येथे झाला. फाळणीनंतर हून कुटुंबीय भारतात आले. १९४७ मध्ये ते शीख रेजिमेंटमध्ये दाखल झाले. डेहराडूनच्या भारतीय लष्करी प्रबोधिनीतून प्रशिक्षण पूर्ण केले. मेघदूत मोहिमेवेळी श्रीनगरस्थित १५व्या कोअरचे कमांडर असणाऱ्या हून यांनी १९६२ मध्ये चीन आणि १९६५ मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धात सहभाग घेतला. कारवाई विभागाचे प्रमुख म्हणूनही काम पाहिले. लष्कराच्या पश्चिमी विभागाचे प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहिले. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दय़ांवर ते सडेतोड भूमिका मांडत. सैनिकांना तैनात असणाऱ्या ठिकाणी मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे सैनिकांसाठी छावणी क्षेत्रात मतदान केंद्राची सुविधा उपलब्ध झाली. ‘द अनटोल्ड ट्रथ’ पुस्तकातून त्यांनी अनेक गोष्टी उलगडल्या. हून यांची कामगिरी देशाच्या संरक्षणार्थ कार्यरत नव्या पिढीला सदैव प्रेरणा देणारी ठरणार आहे.