‘ऑलमन ब्रदर्स बॅण्ड’ या नावाचा अमेरिकी संगीत-समूह ४६ वर्षे टिकला, तोही या ‘ब्रदर्स’पैकी डय़ुआन या थोरल्या भावाची हत्या १९७१ मध्येच झाल्यानंतर एकटय़ा उरलेल्या भावानेच टिकवला, यामागे व्यवहारज्ञान वगैरे अजिबात नव्हते.. या बॅण्डमध्ये किती आले, किती गेले, किती वेळा हा बॅण्ड आता संपणार अशी परिस्थिती आली आणि फुटून-तुटूनसुद्धा हा बॅण्ड कसा परत उभा राहिला हे पाहिल्यास मनुष्यबळ विकास-व्यवस्थापन शिकलेले लोक चक्रावून जातील.. कुणी म्हणेल, ‘कॉपरेरेट विश्वातही असे होतेच- माणसे सोडून जातात, नवी येतात..’ पण तेवढेच नाही! सतत काळाबरोबर कसे राहायचे, याचा घोर कॉपरेरेट विश्वाला असतो. हा संगीतसमूह मात्र १९६० आणि १९७० च्या दशकांतील संगीतशैलींच्याच आवृत्त्या काढत राहिला आणि तरीही अगदी २०१६ पर्यंत न्यूयॉर्कसारख्या शहरातही त्यांचे कार्यक्रम ‘हाऊसफुल्ल’ होत राहिले. फक्त व्यवहारज्ञान दरवेळी कामाला येतेच, असे नाही.. या बॅण्डचा प्रमुख ग्रेग ऑलमन याची प्रबळ जीवनेच्छा आणि माणसातल्या गुणांची कदर करताना स्वत:चा ठेका अजिबात न सोडण्याचा हेकेखोरपणा, यांच्या अजब मिश्रणातून हा बॅण्डही टिकला आणि त्याची कीर्तीसुद्धा अबाधित राहिली. त्या संगीतसमूहाचा प्रणेता ग्रेग अखेर कर्करोगाने मरण पावल्याची बातमी शनिवारी आली.

वेदनेचे व्याकरण जणू ग्रेगला माहीत होते. तो दोन वर्षांचा असताना, १९५० साली त्याच्या वडिलांची हत्या झाली. वडील सैन्यात होते आणि आई गृहिणी. गरीब परिस्थितीमुळे लष्कराच्याच शाळेत ग्रेग आणि डय़ुआन शिकले. तो काळ कृष्णवर्णीय आफ्रिकन-अमेरिकनांच्या बंडाचा आणि त्यांना खुलेपणाने साथ देणाऱ्या काही बिगर-कृष्णवर्णीय तरुणांच्या लोकशाहीवादी धमकेचा होता. नाशव्हिले, फ्लोरिडा अशा अमेरिकेतील दक्षिणेकडल्या भागांत बालपण गेल्यामुळे संगीताचा प्रभाव होताच..  या भागात आफ्रिकन-अमेरिकनसंगीताची परंपरा आहे. ग्रेगच्या हाती लहानपणीच गिटार आल्यावर तो स्वत तर या ‘ब्ल्यूज’ परंपरेच्या नादी लागलाच; पण भाऊ डय़ुआन यालाही त्याने नादाला लावले. इतके की, पुढे डय़ुआनच चांगला गिटारिस्ट झाला आणि तोवर ग्रेग ऑर्गन वाजवू लागला. घर दररोज, अहोरात्र ऑर्गन-गिटार जुगलबंदीने ‘जॅम’ होऊ लागले. ग्रेगला सुरांपाशी न थांबता गाणी सुचू लागली. दोघा भावांनी निरनिराळ्या नावांचे बॅण्ड स्थापन करून, काही गाणी लोकांची आणि काही स्वत:ची असे कार्यक्रम सुरू केले. त्यांचा तिसरा प्रयत्न म्हणजे ‘ऑलमन ब्रदर्स बॅण्ड’. तो मात्र यशस्वी झाला, पण १९७१ साली भाऊ मरण पावला.

सुरेश भटांच्या गज्मलेतला ‘मी’ जसा जगाकडून (अनेकदा प्रियेकडूनही) दु:खच मिळालेला असतो, तसा कलंदर/बेफिकीर तरीही संवेदनशील आणि भावुक नायक ग्रेगच्या ‘व्हिपिंग पोस्ट’, ‘रॅम्बलिंग (रॅम्ब्लिन्) मॅन’, ‘जेसिका’, ‘मेलिसा’ आदी अनेक गाण्यांतून साकारतो. आयुष्यभरात एकंदर सात लग्ने केलेला, गेली काही वर्षे कोटय़धीशच राहिलेला आणि (मोटरट्रेण्ड नियतकालिकातील माहितीनुसार) किमान सात अव्वल गाडय़ांचा मालक असलेला ग्रेग हा गायला लागला की सर्व सुखे विसरून वेदनेच्या वाळवंटात शिरत असे. मग ‘रॅम्ब्लिन् मॅन’सारखे एखादे गाणे श्रोत्याला, सुरुवातीच्या ‘कंट्री म्युझिक’सारख्या आर्त-भावुक विनवणीच्या सुरांपासून ते अखेरच्या तितक्याच आर्त, पण ‘मेटल’सारख्या हृदयात घण घालणाऱ्या सुरावटींपर्यंत घेऊन जाई.

अमली पदार्थ आणि दारू या व्यसनांपायी ग्रेगला अनेकदा सुधारकेंद्रांत जावे लागले. पण पन्नाशीनंतर मात्र पूर्ण व्यसनमुक्त होऊन तो केवळ ‘हॅमॉण्ड बी-थ्री’ या दोन पट्टय़ांवरील १४४ कळांमधून निघणाऱ्या सूरब्रह्मात विलीन होऊ लागला. ‘गॉड’ला आपल्या सुखदु:खांसाठी अनेकदा जबाबदार धरणारा आणि येशूइतकेच खांद्यावर रुळणारे केस वाढवलेला ग्रेग, ‘माय क्रॉस टु बेअर’ (२०१२) हे आत्मचरित्र लिहिताना कर्करोगमुक्त झाला होता.. पण कर्करोग उलटला आणि काही ना काही कारणे देत, हे दुखणे लपवत गेले वर्षभर ग्रेगचे कार्यक्रम रद्द होत राहिले. तो खोटेपणा संपून आता सच्चा सूरच उरला.