गिर्यारोहण हा शारीरिक क्षमतांचा कस पाहणारा साहसी खेळ. पण त्याचबरोबर यात सातत्य हादेखील महत्त्वाचा पैलू असतो. सातत्याचा ध्यास असेल तर मग एखाद्या ठरावीक विषयाला पूर्णपणे न्याय देता येतो. असा न्याय दिला तो वीरेंद्र ऊर्फ हिरा पंडित यांनी. वयाच्या २३ व्या वर्षी म्हणजेच १९७२ मध्ये पंडित यांची सुरू झालेली प्रस्तरारोहणातील कारकीर्द आजही त्याच उत्साहाने आणि जोमाने सुरू आहे.

पंडित यांनी मुंबईतल्या यूडीसीटी महाविद्यालयातून रसायनशास्त्रातील पदवी  प्राप्त केली. त्याच वेळी १९७२ साली त्यांना हॉलिडे हायकर्समुळे डोंगरभटकंतीची आवड लागली. पाठोपाठ गिर्यारोहणातील प्राथमिक आणि प्रगत प्रशिक्षण पूर्ण केले. त्या काळात प्रस्तरारोहणाचे प्रशिक्षण देणारी व्यवस्था अनेक संस्थांच्या माध्यमातून मुंबई-पुणे येथे कार्यरत होती. पण या प्रस्तरारोहणाच्या प्रशिक्षणाचा वापर करून सह्य़ाद्रीतील सुळके आरोहणाची सुरुवात झालेली नव्हती. त्या वेळी पंडित यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत तेलबैलाच्या पहिल्या आणि दुसऱ्या प्रस्तराभिंतीवर आरोहण केले. पण महाराष्ट्रातील प्रस्तरारोहकांना खऱ्या अर्थाने सुळके आरोहणासाठी प्रवृत्त केले ते १९७८ सालच्या लिंगाण्यावरील यशस्वी आरोहणामुळे. रायगडासमोरील हा लिंगाणा यशस्वीरीत्या आरोहित केल्यानंतर त्याची बरीच चर्चा झाली. लगेचच पुढच्या वर्षी पंडित यांनी रायगडाचा भवानी कडय़ावर यशस्वी आरोहण केले. महाराष्ट्रातील सुळके व कडे आरोहणाला खऱ्या अर्थाने या दोन आरोहणांमुळे चालना मिळाली. यानंतर शहापूरजवळील माहुली किल्ले परिसरातील वजीर, भटोबा अशा सुळक्यांवरील कठीण आरोहण यशस्वी केले. १९८५ मध्ये हॉलिडे हायकर्स आणि नेचर लव्हर्स या संस्थांच्या अश्वमेध या सुळके आरोहण अभियानात त्यांनी भाग घेतला होता. पुढे त्यांनी त्र्यंबकच्या डोंगररांगेतील पहिने नवरा-नवरी या सुळक्यांवरदेखील त्यांनी यशस्वी आरोहण केले. या सर्व आरोहणांमुळे नवोदित प्रस्तरारोहकांना एक नवं विश्व खुलं झालं असं म्हणावे लागेल. तुलनेने त्यांचा हिमालयाकडे ओढा कमीच होता. पण १९८६ साली सतोपंथ हिमशिखरावर झालेल्या अपघातात गाडल्या गेलेल्या नंदू पागे, भरत मांगरे आणि डॉ. मिनू मेहता या गिर्यारोहकांच्या शोधमोहिमेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्रात एव्हाना सुळके आरोहण बऱ्यापैकी रुजले होते. हिरा पंडित यांनी मग त्यांनीच आरोहण केलेल्या सुळक्यांवर नव्या मार्गाने आरोहण करायला सुरुवात केली. तर आजवर आरोहण केलेल्या सुळक्यांच्या आरोहणाचा रौप्य महोत्सव साजरा करण्याची सुरुवात लिंगाण्यापासून केली. २००३ मध्ये त्यांनी लिंगाण्यावरील पहिल्या आरोहणातील सर्व १४ आरोहकांच्या कुटुंबीयांसमेवत  रौप्यमहोत्सवी आरोहण यशस्वी केले. आजही अनेक संस्था  लिंगाणा आरोहणासाठी मार्गदर्शक म्हणून त्यांना आमंत्रित करतात. त्यामुळेच आजवर केवळ लिंगाण्यावरच त्यांनी १०० हून अधिक वेळा आरोहण केले आहे. आपल्या कौशल्याचा उपयोग सर्वाना व्हावा, ही त्यांची यामागची भावना असते. त्यामुळेच एकाच संस्थेच्या चौकटीत ते कधीच अडकून पडले नाहीत. सेवानिवृत्त झाल्यानंतर आजही  ६८ व्या वर्षी प्रस्तरारोहणाचा त्यांचा ध्यास कायम आहे. पंडित यांच्या गिर्यारोहणातील या योगदानाबद्दल गिरिमित्र संमेलनात उद्या (९ जुलै) त्यांचा ‘गिरिमित्र जीवनगौरव सन्मान’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. एका प्रस्तरारोहकाच्या आयुष्याची कृतार्थताच त्यात दिसून येते.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई