महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनासाठी गांधीविचार आणि सवरेदय-विचाराच्या पुस्तकविक्रीचे विशेष मांडव देशभरच्या शहराशहरांत घातले जात होते, तेव्हाच तिकडे बडोद्याच्या गोत्री आश्रमात जगदीश शहा यांची प्राणज्योत मालवली. बापूंच्या स्मृतिदिनाची विशेष सभा यंदा जगदीशभाईंचीही शोकसभा ठरली आणि असे गांधीवादी-सवरेदयी कार्यकर्ते आता कमी होत आहेत, याची खंतही अनेकांना वाटली.

गोत्री हे आता बडोदे शहराचाच भाग ठरले आहे. तसे ते जेव्हा नव्हते, तेव्हा विनोबा भावे यांच्या प्रेरणेने येथील आश्रम स्थापणाऱ्यांपैकी जगदीश शहा हे महत्त्वाचे नाव होते. ते तेव्हा तरुणच, पण विनोबाजींनी तावून-सुलाखून घेतलेले, पारखून मगच निवडलेले. वयाच्या अठराव्या वर्षी, चांगले मार्क मिळत असूनही शिक्षणात मन रमत नाही आणि वडिलांच्या सांगण्याप्रमाणे डॉक्टर तर व्हायचेच नाही, त्याऐवजी ‘लोकांसाठी काही तरी चांगले करायचे’ असे वादळ डोक्यात घेऊन जगदीशभाईंनी घर सोडले. तो दिवस होता १५ ऑगस्ट १९५३.  बाबलभाई मेहता, जगतराम दवे अशा गांधींसह राहिलेल्या कार्यकर्त्यांनी चालविलेल्या ‘वेचडी आश्रमा’त जगदीशभाई राहू लागले. इथे पहाटे चारपासून रात्री दहापर्यंत कामे करावी लागत. अगदी झाडलोट किंवा शौचालये साफ करण्यापासून, हिशेबापर्यंत सगळी कामे. सूतकताईचे तास वेगळे आणि ज्यांना शिकायचे आहे त्यांच्यासाठी ‘नयी तालीम’ घेण्याची वेळ राखीव. अशा प्रकारे वर्षभरात ‘गांधीशाळे’तून जगदीशभाई उत्तीर्ण झाले. विनोबा भावे यांना त्यांचे नाव सुचविण्यात आले. विनोबाजींची भूदान चळवळ त्याआधीच (१९५१) सुरू झाली होती. त्या कामातून समाजाला मिळालेली दिशा टिकवून ठेवण्यासाठी आता विविध केंद्रांची, आणि ही केंद्रे चालविणाऱ्यांची गरज होती. या कामासाठी तरुण जगदीशभाईंना विनोबांनी निवडले.

गोत्री आश्रमातच जगदीशभाईंनी स्वत:ला गाडून घेतले. आईच्या अन्त्यसंस्कारांपुरते ते घरी गेले, तेव्हा, ‘आईची अखेरची इच्छा तू लग्न करावेस हीच होती’, याची आठवण त्यांना दिली गेली आणि ती शिरोधार्य मानून पुढे आश्रमातील मंजूबेन यांच्याशी त्यांनी विवाह केला. मंजूबेन यांना आश्रमात सारे ‘बा’ (आई) म्हणतात आणि त्यांची मुले- कपिल व भारत – यांच्यापैकी कपिल हे आता सेंद्रिय शेतीचा प्रसार करतात तर भारत हे वैद्यकीय शिक्षण घेऊन, आश्रमातच निसगरेपचार केंद्र चालवितात.

आश्रमातच अर्धशतकभर राहिलेल्या जगदीशभाईंनी जगभरचे अनेक बदल पाहिले. जगाचे सवरेदयी स्वप्न विरून जाताना दिसे, तेव्हा शक्य तेथे प्रतिकार करायचाच हा त्यांचा बाणा होता. सवरेदयी साहित्याचे प्रकाशन आणि ‘भूमिपुत्र’ या नियतकालिकाचे संपादन जगदीशभाई वर्षांनुवर्षे करीत. या ‘भूमिपुत्र’मधील लिखाण अधिकाधिक टोकदार होऊ लागले. सवरेदयी पठडीत नसणाऱ्यांनाही आपापल्या परीने लढण्याची प्रेरणा देऊ लागले. बडोद्यात २००२ सालच्या २७ फेब्रुवारीपासून, ‘गोध्रा येथे रेल्वे गाडीत अज्ञातांना जाळले म्हणून मुसलमानांचा वचपा काढण्या’ची अहमहमिका सुरू झाली, तेव्हा माहितीतल्या काही मुस्लिमांच्या मदतीने जगदीशभाई हमिदाबेनसारख्या सामान्य महिलेला जगण्याचे बळ देऊ लागले. ‘मी मेले कशी नाही?’ म्हणणाऱ्या हमिदाबेन ‘मी  इतरांसाठी जगेन,’ म्हणू लागल्या, त्या जगदीशभाईंनी मानवतेचा साक्षात्कार घडवल्यामुळे.

गुजरातच्या अनेक शहरांतील ‘भूदान’च्या जमिनी हडप झाल्याचे प्रकरण बाहेर काढून ते धसास लावण्यातही जगदीशभाई सक्रिय होते. एरवी शांतपणे विचारपूस करणारे, पहिल्या भेटीत जणू जन्मांतरीचे नाते जोडणारे जगदीशभाई, अन्यायाविरुद्ध त्वेषाची ठिणगी जरूर फुलवत. मात्र या ठिणगीला अहिंसेची आगळी धग असे. ती धग जगदीश शहा यांच्यासारख्यांच्या विझण्याने कमी होण्याची भीती रास्त ठरते.