प्रसिद्धीच्या- ग्लॅमरच्या हॉलीवूडी जगात ‘ऑस्कर’ला जितके महत्त्व आहे, तितके समीक्षक मान्यतेच्या क्षेत्रात ‘बर्लिनाले’ या बर्लिनमध्ये भरणाऱ्या चित्रपट स्पर्धेतील ‘गोल्डन बेअर’ पुरस्कारांना. यंदा फुयोकोमारे (फायर अ‍ॅट सी) या चित्रपटासाठी ‘गोल्डन बेअर’ मिळवणारे इटलीचे दिग्दर्शक ज्यांफ्रँको रोसी हे नेहमीच त्यांच्या विषयांच्या वैविध्यामुळे लक्षवेधी ठरले आहेत.. रोसी यांची सुरुवात ‘बोटमॅन’ (१९९३) या वाराणसीच्या नावाडय़ावर आधारित लघुपटापासून झाली होती, हे विशेष! युरोपात सध्या निर्वासितांचा फार मोठा लोंढा आफ्रिकी व मध्यपूर्वेकडील देशांतून येत आहे. हा ‘फायर अ‍ॅट सी’चा विषय. रोसी यांनी लॅम्पेडुसा या बेटावरील सागरकिनाऱ्यावर ४० दिवस वास्तव्य करून बनवलेला हा चित्रपट जगण्याच्या धडपडीची असोशी टिपणारा. जेव्हा हे निर्वासितांचे लोंढे येतात तेव्हा त्या बेटावर वास्तव्य करणाऱ्या एका मच्छीमाराचा मुलगा (सॅम्युएली) व बेटावरील एक डॉक्टर (पिट्रो बाटरेलो) यांच्या नजरेतून त्यांनी स्थलांतरितांचा हा जीवनसंघर्ष टिपला. राजकीय भाष्य या चित्रपटात आहेच.. पण ते निवेदनातून वा संवादातून नव्हे; तर केवळ चित्रीकरणातून!

ढग आणि त्यांना चुकवून येणारा प्रकाशाचा कवडसा हे रोसी यांच्या चित्रपटात नेहमीचे पाश्र्वदृश्य. दिग्दर्शक म्हणून त्यांना जास्त प्रकाश आवडत नाही. जीवन-मृत्यू हाच त्यांच्या अन्य चित्रपटांचाही विषय. मृतदेह नेऊन ते गंगेत सोडणाऱ्या ‘बोटमॅन’नंतरही, ‘एल सिकारियो- रूम १६४’ (२०१०) हा ८१ मिनिटांचा चित्रपट शेकडो माणसांचा खून केलेल्या व पूर्वी अमेरिकी पोलीस दलात कमांडर असलेल्या व्यक्तीवर आहे. अशा कुख्यात व्यक्तीशी रोसी हे या चित्रपटात एका हॉटेलच्या खोलीत शांतपणे बसून बोलत आहेत. ‘आफ्टरवर्ड्स’, ‘बिलो सी लेव्हल’, ‘सॅक्रो ग्रा’ या अन्य चित्रपटांतही मरणाचा, जीवनसंघर्षांचा संदर्भ येतो.

दिग्दर्शक-छायालेखक रोसी यांचा जन्मच संघर्षग्रस्त देशातला. ते इटालियन असले तरी इरिट्रियात जन्मले. वयाच्या १३व्या वर्षी इटलीत आले. तरुणपणी रोम व इस्तंबूलमध्ये काम केल्यानंतर ते अमेरिकेत आले. तेथील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी फिल्म स्कूलचे ते विद्यार्थी. त्यांच्या मते वास्तवापेक्षा अद्भुत काहीच नसते, त्यामुळे त्यांनी ठरवून कुठली दृश्ये घातलेली नाहीत, काही ठिकाणी चित्रपटाच्या भाषेत ‘कच्चे चित्रण’ वापरले आहे, तेच त्यांचे बलस्थान. एवढे निर्वासित जीव धोक्यात घालून येतात कशासाठी, हा प्रश्न त्यांनाही पडला होता. नायजेरियन निर्वासितांना ते म्हणालेसुद्धा.. ‘कदाचित मराल’. पण त्यावर एका नायजेरियन माणसाने दिलेले उत्तर बोलके आहे. तो म्हणाला, आम्ही जोखमीच्या सागरी प्रवासात मरण्याची ‘शक्यता’ आहे हे खरे पण जिथून आम्ही आलो तिथे मात्र मृत्यूची ‘खात्री’ आहे.