मुंबईच्या सर ज. जी. कला महाविद्यालयात जेराम पटेल शिकले आणि याच कलासंस्थेत बहरलेल्या केवलाकारी- अमूर्त चित्रपरंपरेत त्यांनी महत्त्वाची भर घातली, पण गेले जवळपास अर्धशतकभर बडोदे येथेच त्यांचा मुक्काम असे. जर्जर अवस्थेत एकटेच राहणाऱ्या जेरामभाईंची निधनवार्ता १८ जानेवारीच्या सकाळी आली, तीही बडोद्याहूनच. तेथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या उपयोजित कला विभागात अध्यापक म्हणून जेराम पटेल १९६०च्या दशकात आले. मुंबईतील कलाशिक्षणानंतर टंककलेचे (टायपोग्राफी) खास शिक्षण त्यांनी लंडनच्या सेंट्रल स्कूल ऑफ ग्राफिक आर्ट्स या संस्थेतून घेतले होते आणि त्यानंतर अहमदाबादेत राष्ट्रीय अभिकल्प संस्थेत (एनआयडी) ते अध्यापक म्हणून रुजू झाले होते. पिंड चित्रकाराचाच, त्यामुळे त्या वेळी कलावंतांनी बहरलेल्या बडोद्यात जेराम आले आणि पुढल्या तीन पिढय़ांसाठी ‘जेरामभाई’ झाले. थोर दिवंगत अमूर्तरचनाकार नसरीन मोहम्मदी आणि जेराम पटेल यांनी एकमेकांच्या सहवासात काम केले.. त्यामुळे जेराम यांची चित्रे काहीशी निवळली, शांत भासू लागली, असे जाणकार सांगतात! पण अंतर्यामीची सारी खळबळ, सगळा विद्रोह केवळ रेषेतूनच नव्हे तर चित्रपृष्ठावर केलेल्या प्रत्येक कृतीतून स्पष्ट दिसावा, हे जेराम यांचे वैशिष्टय़ कायमच राहिले.

कधीकाळी एफ एन सूझांसारखी चित्रे करणारे जेरामभाई बडोद्यात ‘असेम्ब्लाज’ करू लागले होते. खिळ्यांपासून अनेक वस्तूंच्या एकत्रीकरणातून, भित्तिशिल्पांसारखी थोडी त्रिमित भासणारी ही चित्रे होती. ‘मिळेल ते साधन चित्रकामासाठी वापरून पाहायचे’ हा त्यांचा बाणा नसरीन-सहवासात निवळला. जेरामभाईंच्या रेखाचित्रांतली रेषा रेखीव दिसू लागली आणि विद्रोह आता आकारांमध्ये घुटमळतो की काय, असे चाहत्यांना वाटू लागले. मात्र याच काळात जेराम यांनी विद्रोहाची अक्षरश: पेटती मशालच  हाती घेतली आणि जाड (सहा इंची जाडीचे सुद्धा) प्लायवूडचा पृष्ठभाग त्या मशालीने जाळून त्यांच्या दृश्यकलाकृती घडू लागल्या. ‘माणूस फक्त असलेले मिटवू शकतो, नवे काहीही घडवू शकत नाही,’ अशा शब्दांत निसर्गसर्जनावर विश्वास आणि मानवी ‘प्रगती’च्या बढायांवर अविश्वास ठेवणारे चिंतन मांडून जेराम यांची ही निर्मिती- किंवा नकारनिर्मिती- सुरू होती. नकारास्वातंत्र्याच्या तत्त्वाशी प्रामाणिक राहून, आपल्या कलाकृतींना आध्यात्मिक वगैरे म्हणवत त्यांच्या किमती वाढवण्याचे तंत्र त्यांनी निग्रहपूर्वक टाळले. या तत्त्वनिष्ठेमुळे त्यांचे व्यक्तित्व आदरणीय ठरले. त्यांच्या कलाकृती आवडणारे वा त्याप्रमाणे काम करणारे लोक बडोद्यात काय, कुठेही कमीच होते. पण त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांच्याविषयी काहीसा विस्मययुक्त आदर बाळगणारे भरपूर! बडोद्यातील ‘ग्रूप १८९०’ या अल्पजीवी कला-गटाची १९६३ साली स्थापना झाली, त्यात आघाडीवर असलेले जेराम उत्तरायुष्यातही साऱ्यांनी हवेहवेसे वाटणारेच होते.