यूटय़ूबचे आगमन झाल्यापासून विविध खाद्यपदार्थाच्या पाककृती टाकण्याची संधी खाद्यप्रेमींना मिळू लागली आहे. पण या क्षेत्राला वलय नव्हते त्या काळातही तरला दलाल, हेमंत ओबेरॉय, मोहित गुजराल, रितू दालमिया यांची नावे अभिजन वर्गात आदराने घेतली जात. या श्रेणीत नसले तरी काही अर्थानी ते या बल्लवाचार्यापेक्षाही उच्च श्रेणीचे होते, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. जसपाल इंदरसिंग कालरा हे ते नाव. भारतातीलच नव्हे तर जगभरातील दर्दी खवय्यांसाठी ते होते जिग्स कालरा!

भारतीय खाद्यपदार्थ चविष्ट असतात, पण त्याचा स्वाद सर्वत्र सारखाच वाटतो. त्यात नावीन्य नसते किंवा भारतातील बल्लवाचार्य खाद्यपदार्थात प्रयोग करत नाहीत, अशी टीका होत असे. त्याला उत्तर देण्याचे मोठे काम कालरा यांनी केले. सुमारे पाच दशके ते या क्षेत्रात वावरले. रूढार्थाने त्यांनी कोणत्याही संस्थेतून हॉटेल मॅनेजमेंटची पदवी मिळवली नव्हती. या विषयाला वाहिलेली जगभरातील प्रमुख नियतकालिके वाचूनच सुरुवातीला त्यांनी पाककृती बनवण्यास प्रारंभ केला. दिल्लीत राहत असल्याने खुशवंत सिंग यांच्यासारख्या अवलिया पत्रकाराशी त्यांचा दोस्ताना झाला. त्यांच्यामुळे विविध ठिकाणी खाद्यपदार्थविषयक स्तंभ लिहिण्याची संधी त्यांना मिळाली. मग दिल्लीत त्यांनी मुलगा झोरावर याला साथीला घेऊन स्वत:चे ‘पंजाब ग्रिल’ हे रेस्तराँ सुरू केले. पनीर लबाबदार, बटर चिकन, दाल मखनी, पान शॉट यासारखे लज्जतदार पदार्थ चाखण्यासाठी दिल्लीकरांची तेथे झुंबड उडायची. यानंतर ‘मसाला लायब्ररी’ नावाचे दुसरे रेस्तराँ त्यांनीसुरू केले. कॅव्हियर जिलेबी, चारकोल भजे, मशरूम चहा असे अफलातून पदार्थ तेथे मिळतात. भारतीय पाककृतींची माहिती देणारी ११ पुस्तके त्यांनी लिहिली. त्यापैकी ‘प्रशाद’ हे पुस्तक अफाट गाजले. स्पेनला ते गेले असता ‘मॉलेक्युलर गॅस्ट्रॉनॉमी फूड’ हे तंत्र त्यांनी आत्मसात केले व आपल्या  पदार्थात त्याचा वापर केला. पदार्थामध्ये फेस आणणे किंवा कोळशाच्या धुराचा स्वाद खाद्यपदार्थात उतरवण्याचे हे तंत्र नंतर लोकप्रिय झाले. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, अटलबिहारी वाजपेयी, युवराज्ञी डायना अशा असंख्य मान्यवरांनी  त्यांच्या पाककौशल्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा भारतभेटीवर आले असता त्यांना कोणते पदार्थ खिलवायचे हे कालरा यांनीच ठरवले होते. ग्राहकांशी बोलून, त्यांचे अभिप्राय ऐकून त्यानुसार नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत. कालरा यांच्या निधनाने भारतीय खाद्यपदार्थ विदेशातही लोकप्रिय करणारा सच्चा खाद्यप्रेमी आपल्यातून निघून गेला आहे.