भारतीय  राजकारणाला वेगळे वळण देणारे बोफोर्स प्रकरण, बिहारमधील लालूप्रसाद यादव यांचा धाकदपटशा संपवणारे चारा घोटाळा प्रकरण यांसारखी महत्त्वाची प्रकरणे सीबीआयचे संचालक म्हणून हाताळण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणाऱ्या जोगिंदर सिंग यांच्या निधनाने एक चांगला पोलीस अधिकारी काळाच्या पडद्याआड गेला आहे. सिंग यांची वयाच्या विसाव्या वर्षी आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली. ते कर्नाटक केडरचे अधिकारी होते. त्यांनी देवेगौडा पंतप्रधान असताना केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयची सूत्रे १९९६ मध्ये हाती घेतली, त्या वेळी हवाला प्रकरणाची चौकशी महत्त्वाच्या टप्प्यात होती. त्यांचा कार्यकाल अकरा महिन्यांचा असूनही त्यांनी अतिशय महत्त्वाची प्रकरणे हाताळली होती.

जानेवारी १९९७ मध्ये त्यांना ६५ कोटींच्या बोफोर्स दलाली प्रकरणातील स्विस बँकेची गुप्त कागदपत्रे बर्न येथे हाती लागली, त्यानंतर त्यांनी सेंट कीट्स व रोखे घोटाळा ही प्रकरणेही हाताळली. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले होते. ब्रिटन, अमेरिका, जर्मनी व फ्रान्स या देशांत गेलेल्या सरकारी शिष्टमंडळांचे नेतृत्वही त्यांनी केले होते. लालूप्रसाद यादव यांच्यावर चारा घोटाळाप्रकरणी खटला भरण्याची परवानगी देण्याचे धाडस त्यांनी दाखवले. त्या वेळी राजद हा लालूंचा पक्ष केंद्र सरकारचा घटक पक्ष होता, पण त्यानंतर काही आठवडय़ांतच त्यांची बदली करण्यात आली. अगदी कमी काळात झारखंड मुक्ती मोर्चा खासदारांचे लाच प्रकरण, १३३ कोटींचा युरिया घोटाळा व तेव्हाचे केंद्रीय मंत्री सुखराम यांचा दूरसंचार घोटाळा ही प्रकरणेही त्यांनी हाताळली. ते स्पष्टवक्ते होते, सीबीआयच्या कार्यपद्धतीवर तसेच भ्रष्टाचारावर त्यांनी परखड भाष्य केले.  चारा घोटाळ्याच्या चौकशीवेळी त्यांना अनेक आमिषे दाखवण्यात आली होती, कारण लालूप्रसाद यादव व जगन्नाथ मिश्र या दोन माजी मुख्यमंत्र्यांचे भवितव्य त्या वेळी पणाला लागले होते.

जोगिंदर सिंग यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९३९ रोजी तेव्हाच्या पंजाब प्रांतातील माँटगोमेरी जिल्ह्य़ात झाला होता. तेथे त्यांची जमीन होती पण फाळणी झाल्यानंतर जोगिंदर, त्यांचे आईवडील व दोन बहिणी दिल्लीत आले, नंतर जातीय दंगलींमुळे त्यांना परत जाता आले नाही.

नंतर १९५० मध्ये त्यांचे कुटुंबीय फिरोझपूरच्या पश्चिमेला जलालाबाद येथे स्थायिक झाले. नंतर ते स्थानिक शाळेत पाचवीपर्यंत शिकले. फिरोजपूरच्या सरकारी शाळेतून मॅट्रिक झाले, नंतर लुधियानातील महाविद्यालयातून पदवी घेतली. वसतिगृहात ते रहात होते. तेथे ते उत्तम वक्ते म्हणून प्रसिद्ध होते. नंतर म्हैसूरला ते युवामहोत्सवासाठी गेले असता त्या वेळी त्यांना आयपीएसची प्रेरणा मिळाली. कुर्ता पायजमा घालून ते आयपीएसच्या मुलाखतीला गेले होते. त्यांना पहिला सूट शिवण्यासाठी पैसे उसने घ्यावे लागले. नंतर पोलिस सेवेत त्यांना घेण्यात आले.

पोलीस सेवेत त्यांना घेण्यात आले. कर्नाटकात ते बिदरचे पोलीस अधीक्षक होते,  तसेच युवा सेवेचे संचालक होते. आयटीबीपीचे महासंचालक, अमलीपदार्थ विरोधी पथकाचे महासंचालक, रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक ही पदेही त्यांनी भूषवली. स्वामी विवेकानंद व मोहन भागवत यांचे ते चाहते होते. त्यांनी एकूण ३० पुस्तके लिहिली, त्याचे भाषांतर अनेक भारतीय भाषांत झाले आहे. अनेक नियतकालिकांत त्यांनी लेखन केले. प्रामाणिक व निर्भीड अधिकारी म्हणून ते प्रसिद्ध होते. प्रसारमाध्यमे त्यांना टायगर संबोधत असत, कारण त्यांनी बोफोर्ससारखी संवेदनशील प्रकरणे हाताळली होती.