चित्रपटातील प्रेक्षकांच्या टाळ्या घेणारा विनोदी कलाकार, द्वयर्थी-टपोरी संवाद लिहिणारा लेखक अशीच त्यांची कायम ओळख राहिली, मात्र प्रत्यक्षात कादर खान यांचे व्यक्तिमत्त्व सुजाण आणि अभ्यासू होते. पण, उदरनिर्वाहासाठी पडद्यावरची प्रतिमाच महत्त्वाची आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी शांतपणे आपली खरी ओळख बाजूला ठेवत लोकप्रिय प्रतिमाच कायम जपली.

कादर खान यांचा जन्म काबूलमधला. वडील कंदहारचे, आई पाकिस्तानची, पण ते लहानाचे मोठे झाले ते इथे मुंबईतील कामाठीपुरा भागात. कामाठीपुरातील त्यांची जडणघडण, आजूबाजूला दिसलेली गरिबी, वातावरण या सगळ्याचा प्रभाव त्यांच्या संवाद-पटकथालेखनावर पडला. मात्र याही परिस्थितीत त्यांनी शिक्षणाची कास सोडली नव्हती. स्थापत्य अभियंता म्हणून पदवी घेतलेला आणि प्राध्यापक म्हणून महाविद्यालयातून शिकवणारा हा अवलिया कलाकार शुद्ध हिंदीत बोलायचा. एवढेच नाही तर महाविद्यालयात एकांकिका, नाटक लिहिणे-त्यातून अभिनय करणे याचा गाढा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. साहित्यावरही त्यांचे प्रभुत्व होते. मात्र, मनमोहन देसाई ते डेव्हिड धवन यांच्या तद्दन व्यावसायिक मसाला चित्रपटातील त्यांच्या विनोदी भूमिका आणि त्यांनी लिहिलेले संवाद खूप गाजले. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यामुळे त्यांना पहिल्यांदा ‘रोटी’ या चित्रपटाचे संवाद लिहिण्याची संधी मिळाली. त्या संवादलेखनासाठी दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी त्यांना एक लाख रुपयांपेक्षा जास्त मानधन दिले होते. त्यानंतर कादर खान यांनी मागे वळून पाहिले नाही. चित्रपटसृष्टीतील तो काळच मुळी मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरांसारख्या मसाला चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकांचा होता.

या दोघांच्या चित्रपटांची जी धाटणी होती त्याला योग्य पद्धतीचे संवाद लिहिण्याचे काम कादर खान यांनी चोख पार पाडले. त्या काळी प्रत्येक दिग्दर्शकाची स्वत:ची अशी पटकथा-संवादलेखकांची टीम होती, प्रत्येकाचा कंपू वेगळा होता. कादर खान यांनी पटकथालेखनात फार रस घेतला नाही, त्यांचा जोर संवादलेखनावरच राहिला. एरवी विनोदी भूमिका, टाळ्या घेणारे संवाद यात रमलेल्या कादर खान यांनी स्वत: बंगाली कादंबरीवर आधारित ‘शमा’ (गिरीश कर्नाड, शबाना आझमी) हा चित्रपट केला तो मात्र गंभीर विषयावरचा होता आणि तो फारसा चालला नाही. त्यामुळे तिकीटबारीवर जे चालले, नावलौकिक आणि पैसा मिळवून देत गेले त्याच प्रकारच्या संवादलेखनावर आणि भूमिकांवर कादर खान यांनी लक्ष केंद्रित केले. ते प्रत्यक्षात जसे होते तसे ते लोकांसमोर कधीच आले नाहीत हेच या प्रतिभावंत कलाकाराचे दुर्दैव म्हणावे लागेल.