कर्करोगाला आमंत्रण देणाऱ्या सिगारेट कंपनीचे मालक आणि आयपीएलमुळे कुप्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ललित मोदींचे वडील, ही के. के. मोदी यांची एक ओळख! असे असले तरी सुमारे ३ अब्ज डॉलरचा व्यवसाय डोलारा अवघ्या चार-साडेचार दशकांच्या कालावधीत उभे करणारे आणि आयटीसीसारख्या मातब्बर समूहाला तेवढीच यशस्वी टक्कर देणारे उद्योगपती म्हणून के. कें.नी मोदी कुटुंबातील सर्वात मोठे सदस्य म्हणून कारकीर्द गाजविली. गेल्या आठवडय़ात दिल्लीत वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कृष्ण कुमार ऊर्फ के.के. मोदी अवघ्या विशीतच काकांबरोबर समूहाच्या वस्त्रोद्योगात उतरले. काका, वडिलांच्या पारंपरिक व्यवसायाचे खऱ्या अर्थाने उद्योगसमूहात रूपांतर करण्यात के.कें.चा सिंहाचा वाटा होता. त्याला साजेसे ‘मोदी एंटरप्रायजेस’ नाव देत कॉर्पोरेट संस्कृती त्यांनी रुजविली. दिल्लीनजीक नव्वदच्या दशकात वसविण्यात आलेले ‘मोदीनगर’ हे याच घराण्याचे योगदान. ‘गॉडफ्रे फिलिप्स’ समूहातील सिगारेट कंपनीच्या फोर स्क्वेअर, कॅव्हेंडरसारख्या नाममुद्रा  बलाढय़ अशा आयटीसीच्या विल्स आदींसमोर त्यांनी उतरविल्या. त्याचबरोबर शिक्षण, कृषी, खाद्यान्न क्षेत्रातील विविध उत्पादनांची निर्मितीही त्यांनी केली. व्यवस्थापनाचे कोणतेही औपचारिक शैक्षणिक धडे न गिरविलेल्या के. के. यांनी दूरदृष्टिकोनातून व्यवसायाला उद्योग समूहात रूपांतरित केले. फिक्की, सीआयआय आदी उद्योग संघटनांवर प्रतिनिधित्व करणाऱ्या के. के. यांनी ‘फोर्ब्स’च्या श्रीमंतांच्या यादीतही स्थान पटकावले.

के. के. मोदी हे अकरा भावंडांमध्ये सर्वात मोठे. कुटुंबात अनेक संकटे आल्यानंतर ती त्यांनी यशस्वीपणे निस्तरली. मात्र मुलगा, ललित मोदींच्या आयपीएल आर्थिक घोटाळ्यामुळे त्यांना नाहक टीकेला सामोरे जावे लागले. ललित यांनी वयाने लहान व घटस्फोटित महिलेशी लग्न केल्यामुळे के. के. यांना झाले नाही तेवढे दु:ख आयपीएल प्रकरणात झाले. चार वर्षांपूर्वी स्विस बँकेतील व्यवहारप्रकरणी प्राप्तिकर विभागाच्या विचारणेलाही त्यांना चिरंजीवांमुळे सामोरे जावे लागले. याही स्थितीत त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत मोदी एंटरप्रायजेसची धुरा यशस्वीपणे हाताळली. पत्नी बिना यांना स्वयंपाकाची आवड म्हणून राजधानीत थाई हॉटेल चालवायला देणारे के. के. यांनी आपल्या हयातीतच उद्योगसमूहाची जबाबदारी उत्तराधिकाऱ्यांकडे सोपविली होती.