राजस्थानातील थर वाळवंटाचा जो भाग १९४७ पूर्वीच्या बहावलपूर संस्थानात होता, त्याला ‘चोलिस्तान’ किंवा ‘रोही’ प्रांत असे म्हणतात. बहावलपूर हे संस्थान पाकिस्तानात विलीन झाल्यामुळे हा भाग त्या देशात गेला. पण इथल्या मूळ रहिवाशांनी आपली संस्कृती टिकवली. इतकी की, या सांस्कृतिक वेगळेपणाची दखल पाकिस्तानला घ्यावीच लागली. पाकिस्तानच्या या नरमाईमध्ये लोकगीत गायक कृशनलाल भील यांचा वाटा मोठा होता. आपल्याच भाषेत, पारंपरिक पद्धतीनेच ते गात-नाचत राहिले. या कृशनलाल भील यांचे निधन गुरुवारी झाले.

अनेक भाषा त्यांना अवगत होत्या. मारवाडी भाषेशी मिळत्याजुळत्या मातृभाषेखेरीज हिंदी, सिंधी आणि उर्दू ते बोलू शकत. असे असले तरी, कलावंत म्हणून मारवाडी/ रेगिस्तानी/ राजस्थानी हाच कृशनलाल यांच्या भाषेचा रंग. त्या भाषेतील गीते ते गात. आपल्या लांगा-मंगनियार गानपरंपरेसारखीच त्यांची शैली होती. लग्नगीते किंवा नववधूला निरोप देण्याची गीते, मूल जन्मल्यानंतर किंवा बारशाला म्हणण्याची गाणी, उंटासाठी खास गाणी अशा प्रकारची गाणी रोही भागात गायली जात. गीतांचे हे सारे तपशील भारतीय वाळवंटातील गीतपरंपरांशी मिळतेजुळते आहेत. एकतारी किंवा रावणहत्ता यांच्या सुरावर, भरपूर तालवाद्यांच्या साथीने वाळूच्या सरकत्या टेकडय़ांसारखा कृशनलाल यांचा आवाज लहरत जाई. हातातील भरपूर सजवलेली एकतारी वाजवत, गाता गाता ते मध्येच नृत्यमय हालचाली करीत, तेव्हा त्यांच्या ऊर्जेलाही दाद मिळे.

प्रयोगकलांना प्रोत्साहन देण्यासाठी वर्ण/ जाती/ देश निरपेक्ष पारख असावी लागते. पाकिस्तानातील काही नाटय़कर्मी आणि काही लोककला अभ्यासक यांच्याकडे तशी पारख असल्याने १९८०च्या दशकापासून कृशनलाल यांना व्यासपीठ मिळत गेले. अलीकडल्या काळात तर, लाहोरच्या ‘लोक मेला’मध्ये दरवर्षी कृशनलाल यांच्या पथकाची हजेरी ठरलेली असे. जर्मनी, नॉर्वे, दुबई (सं. अरब अमिराती) आदी देशांमध्ये त्यांचे कार्यक्रम झाले होते.  बहुतेकदा अशा राजस्थानी गायकांच्या पथकांत पुरुषच असतात. मात्र कृशनलाल यांनी एक पाऊल पुढे जात स्वत:च्या पत्नीलाही पथकामध्ये महत्त्वाचे स्थान दिले होते.

वयाच्या ६७व्या वर्षी, मूत्रपिंडाच्या विकारामुळे रुग्णालयात गेले पाच दिवस उपचार सुरू असताना कृशनलाल भील यांना मृत्यूने गाठले.