ऐसा लगता है और इस क्षण तो खास तौर से

कि मुझसे कविता नहीं लिखी जा सकेगी

कविता लिखने के लिए

दिमाग चाहिए झनझनाता हुआ,

चाहिए  ना?

गुजराती भाषेतील ज्येष्ठ कवी, लेखक लाभशंकर जादवजी ठाकर यांची त्यांच्याच कवितेमागची प्रेरणा सांगणारी ही कविता. कविता सुचण्यासाठी संवेदनशील, अस्वस्थ मन असावे लागते. एरवी कविता सुचते कशी हे कवीच्याच भाषेत फार थोडय़ा वेळा वाचकांना ऐकायला मिळते, पण लाभशंकर यांनी या कवितेत ही संवेदनशीलताच हरवून आपण बसलो तर कविता करू च शकणार नाही, अशी कल्पना मांडली आहे व त्या भीतीनेच ते अस्वस्थ होतात, कारण कविता हाच त्यांचा प्राण. लाभशंकर जादवजी ठाकर हे प्रतिभासंपन्न कवी होते, त्यांचे नुकतेच झालेले निधन गुजराती साहित्याची ओंजळ रिती करणारे.

त्यांचा जन्म गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्य़ातील पाटडी तालुक्यातला.  ते केवळ साहित्यिक नव्हते तर आयुर्वेदातील उत्तम डॉक्टरही होते. गुजराती साहित्यातील आधुनिकतावादी परंपरेचे ते पाईक होते. ज्याची मुहूर्तमेढ गुजराती भाषेत मधू राय यांनी रोवली, त्यांच्याबरोबर त्यांनी हा साहित्यविचार पुढे नेला. लाभशंकर यांचे लेखन गुजरातीतच आहे. ‘पुनर्वसु’ या टोपणनावाने ते ओळखले जात होते, त्यांनी नाटके , कविता व कथा लिहिल्या. वही जटी पछ्छल रम्या घोषा, मानसनी वाट, मारा नामने दरवाजे, बूम कागलमा कोरा, प्रवाहन हे त्यांचे काव्यसंग्रह. त्यात गाजलेला काव्यसंग्रह म्हणजे कलाग्रंथी. त्यांची कविता आधी पारंपरिकच होती, पण नंतर ते प्रायोगिकतेकडे वळले, वास्तववादापेक्षा त्यांना निर्थकतावाद, व्यस्ततावादाचे आकर्षण जास्त होते. सॅम्युएल बेकेट यांच्या वेटिंग फॉर द गोदो या नाटकाचे त्यांनी सुभाष शहा यांच्यासमवेत एक उंदर अने जदुनाथ हे गुजराती  नाटय़ रूपांतर केले होते. मारी जवानी माझा हा त्यांचा एकपात्री नाटकांचा संग्रह पूर्ण निर्थकतावादी शैलीत गुंफलेला होता.  आकंठ साबरमती या नाटय़प्रयोग मंचाशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यातून त्यांनी नाटकांमध्ये नवे प्रयोग केले. खऱ्या प्रेमाच्या शोधात निघालेल्या अभिनेत्रीची गोष्ट त्यांनी पिलू गुलाब आने हू या नाटकातून मांडली. त्यांनी अकस्मात व कोण? या दोनच कादंबऱ्या लिहिल्या. मलेला जीवनी समीक्षा व इनर लाइफ हे दोन समीक्षाग्रंथही त्यांच्या नावावर आहेत.  कृती व उन्मूलन ही साहित्य नियतकालिके त्यांनी चालवली.   तोलान आवाझ घुंघट या काव्यसंग्रहासाठी त्यांना  साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. गुजराती साहित्य अकादमीने त्यांना साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. गुजराती साहित्य सभेच्या रणजितराम सुवर्णपदकाचे ते मानकरी ठरले.