01 March 2021

News Flash

डॉ. सुमन बेलवलकर

म्हैसूरच्या भाषा केंद्रातून त्या प्राचार्या म्हणून निवृत्त झाल्या.

गेल्या शतकाच्या प्रारंभी युरोप-अमेरिकेत आकाराला आलेल्या भाषाविज्ञान या अभ्यासशाखेमुळे भाषेकडे शास्त्रीयपणे पाहिले जाऊ लागले. त्या अभ्यासशाखेशी परिचय झालेल्या महाराष्ट्रीयांनी मराठीकडे भाषाविज्ञानाच्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली ती गतशतकाच्या मध्यात. तिथून मराठीचा भाषाअभ्यास विद्यापीठीय पातळीवर होऊ लागला. मराठी भाषाअभ्यासात या काळात अनेक  विद्वत्जनांनी आपल्या विद्वत्तेची गुंतवणूक केली. या मराठी भाषाअभ्यासीय वर्तुळाच्या दुसऱ्या पिढीतील महत्त्वाच्या भाषाअभ्यासक ठरलेल्या डॉ. सुमन वासुदेव बेलवलकर यांचे अलीकडेच निधन झाले.

साठच्या दशकाच्या अखेरीस सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून सुमन बेलवलकर यांनी सुवर्णपदकासह पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि पुढील काळात त्या म्हैसूर येथील ‘सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन लँग्वेजेस्’ या संस्थेच्या डेक्कन महाविद्यालयात रुजू झाल्या. या संस्थेच्या पश्चिम विभागीय भाषा केंद्रात त्या दीर्घकाळ कार्यरत होत्या. तिथे त्या अमराठी भाषकांना मराठी भाषेचे धडे देत. इथे त्यांनी मराठीचे अनेक परभाषक विद्यार्थी घडवले. त्यांच्याकडून मराठीचे धडे गिरवलेल्या अशा अनेक विद्यार्थ्यांनी पुढे आपापल्या प्रांतात जाऊन मराठीच्या अभ्यासाचे आणि प्रसाराचे कार्य सुरू केले. मराठीच्या अस्मितावादी आविष्कारापेक्षा सुमन बेलवलकर यांच्यासारख्या अभ्यासकांचे हे कार्य निश्चितच मराठी भाषा-संस्कृतीला पुढे घेऊन जाणारे ठरते. म्हैसूरच्या भाषा केंद्रातून त्या प्राचार्या म्हणून निवृत्त झाल्या. या दीर्घकाळच्या अध्यापकीय कारकीर्दीत आणि त्यानंतरही त्यांनी मराठीविषयक अल्पच, स्फुट स्वरूपाचे, तरी प्रगल्भ लेखन केले.

माणूस भाषिक सामग्री आणि ती वापरण्याची पद्धत एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे सोपवत आला आहे. ही सामग्री आणि पद्धत म्हणजे भाषा. तिचा माणसाने प्रत्यक्ष वापर करणे म्हणजे भाषेची अभिव्यक्ती. ही अभिव्यक्ती म्हणजे एक प्रकारे सांस्कृतिक-ज्ञानव्यवहार असते. त्या व्यवहारात ज्ञानाची देवाणघेवाण होते, म्हणून त्यासाठीची विशिष्ट व्यवस्था आखली पाहिजे, हा आग्रह भाषाअभ्यासात होतो. त्याचे रास्त भान डॉ. बेलवलकर लिखित भाषिक शिक्षणाच्या पुस्तकांत पुरेपूर आढळते. म्हैसूरच्या भाषा केंद्राद्वारे त्यांनी विजया चिटणीस यांच्यासमवेत लिहिलेले ‘अ‍ॅन इन्टेन्सिव्ह कोर्स रीडर इन मराठी’ आणि त्याच मालिकेतील ‘मराठी जीवन छटा’, ‘मराठी शारदियेच्या चंद्रकळा’ ही पुस्तके म्हणजे मराठी द्वितीय भाषा म्हणून शिकत असलेल्यांसाठी पाठय़पुस्तकेच असली, तरी त्यात भाषेच्या सामाजिक भूगोलाविषयीची दाखवलेली आस्था पाठय़पुस्तक निर्मितीशी संबंध असलेल्यांसाठी मार्गदर्शक ठरावी. हे सारे करताना मराठीचे आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचे झालेले दर्शन त्यांनी ‘लोकसत्ता’तील स्तंभातून मांडले होते. वाचकप्रिय ठरलेल्या त्या स्तंभाचे नंतर ‘बेलभाषा’ या नावाने पुस्तकही झाले. याशिवाय ‘महाराष्ट्र भूमी, भाषा आणि साहित्य’ हे त्यांचे पुस्तकही महत्त्वाचे आहेच; मात्र ‘लीळाचरित्रातील समाजदर्शन’ हा प्रबंध ग्रंथ त्यांच्यातील साहित्यचिकित्सकाची चुणूक दाखवणारा आहे. यादव काळातील सामाजिक-सांस्कृतिक जीवनाचा साक्षीदार असलेल्या म्हाइंभट कृत ‘लीळाचरित्रा’च्या पुरातत्त्वीय अभ्यासास भाषाअभ्यासक डॉ. ना. गो. कालेलकर यांच्या प्रेरणेने त्यांनी सुरुवात केली. साहित्याचा सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास कसा करावा, याचा जणू वस्तुपाठच ठरावा अशा या ग्रंथात ‘लीळाचरित्रा’तील जीवनदर्शन उलगडून दाखवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 5:09 am

Web Title: language practitioner suman belvalkar profile zws 70
Next Stories
1 देवीप्रसाद त्रिपाठी
2 कोनेरु हंपी
3 सरोजिनी डिखळे
Just Now!
X