कवी, लेखक, कलावंत यांच्यावर अनेकदा डावेपणाचा किंवा ‘व्यवस्थाविरोधक’ असल्याचा शिक्का मारला जातो. प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला विरोध करणे हे या लोकांचे काम नाही, त्यांनी फक्त कविता कराव्या, कथा लिहाव्या, गाणी गावी, चित्रे काढावी असे बजावले जाते. पण जे कलावंत वैचारिकदृष्टय़ा परावलंबी नाहीत, ते ‘हे योग्य नाही’ असे सांगण्याचीही धमक बाळगतातच आणि त्यामुळे, आंदोलने, निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही या कलावंतांचा आधार वाटतोच! अशा प्रकारचे- थेट राजकीय नव्हे पण बंडखोरीला प्रोत्साहन देणारे- विचार लॉरेन्स फर्लिन्गेटी यांनी आपल्या कवितांतून आणि लिखाणातून रुजवले आणि प्रकाशक म्हणूनही, कलावंतांच्या सच्च्या बंडखोरीला आधार दिला. त्यासाठी प्रसंगी स्वत: कैदकोठडीत जाण्याची किंमतही मोजली! या लॉरेन्स फर्लिन्गेटी यांची निधनवार्ता सोमवारी (२२ फेब्रु.) आली.. वय १०१! कोविडची लस अलीकडेच घेतली होती, पण फुप्फुसांत त्रास सुरू झाला आणि सान फ्रान्सिस्कोतील राहत्या घरीच त्यांनी प्राण सोडला.

१९१९ साली जन्मलेल्या, आईवडील वारल्याने नातेवाईकांकडे वाढलेल्या पण बीए, एमए पदव्या अमेरिकेत मिळवून पॅरिसच्या ‘सॉरबाँ’ विद्यापीठात पीएच.डी. केलेल्या लॉरेन्स यांचे तरुणपण दुसऱ्या महायुद्धाआधीच्या अस्वस्थ काळातले. महायुद्ध संपल्यावर उगवली ती ‘बीट जनरेशन’ ही हिप्पींच्याही आधीची बंडखोर अमेरिकी पिढी, त्यातील कवींना- ‘बीट पोएट्स’ना लॉरेन्स यांचा आधार वाटे. अ‍ॅलन गिन्सबर्ग हे ‘बीट पोएट्स’चे अग्रणी. ‘हाउल’ हा गिन्सबर्गचा काव्यसंग्रह प्रकाशित करून लॉरेन्स यांनी प्रकाशन-व्यवसायात पाऊल ठेवले. तोवर लिखाण, पत्रकारिता या उद्योगांना त्यांनी पुस्तकविक्रीचीही जोड दिली होती. १९५० मध्ये स्थापन झालेल्या ‘सिटी लाइट्स बुक स्टोअर’मध्ये (५०० डॉलर भरून) त्यांनी समान भागीदारी मिळवली होती.

सान फ्रान्सिस्कोच्या ‘कोलंबस अ‍ॅव्हेन्यू’वरले ‘सिटी लाइट्स’ हे केवळ पुस्तक विक्रीकेंद्र नव्हते, तर कवी/ लेखकांचा अड्डा होते! इथे यावे, मनसोक्त पुस्तके वाचावीत आणि इतरांशी भरपूर गप्पा माराव्यात हा क्रम १९९० च्या दशकापर्यंत तरी, नवलेखकांना बळ देणारा ठरत होता. या सिटी लाइट्सने प्रकाशनधंद्यात ‘हाउल’द्वारे केलेले पदार्पणच वादळी ठरले. ‘हाउल’वर अश्लीलतेचा खटला झाला आणि प्रकाशक म्हणून लॉरेन्स यांना कैद झाली. यानंतरही ‘बीट पोएट्स’ची पुस्तके ‘पॉकेट पोएट्स’ या मालिकेअंतर्गत सिटी लाइट्सने काढलीच. स्वत: लॉरेन्सदेखील कवी होते. बीट्स कवींइतकेच वाभरे होते. पण ‘मी बीट्स कवी नाही’ असे सांगण्याचे मोठेपणही त्यांच्याकडे होते. चित्रकलेचीही त्यांना आवड, या चित्रांची प्रदर्शने स्थानिक पातळीवर सतत भरत. अशा बहुरंगी सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वाला फ्रान्सच्या ‘कला क्षेत्रातील उमराव’ किताबासह अमेरिकेच्या राष्ट्रीय पुस्तक पुरस्कारापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले होते. ‘कोनी आयलंड ऑफ द माइंड’ हे त्यांचे पुस्तक नोबेल मानकरी बॉब डिलनसह अनेकांना महत्त्वाचे वाटे. अर्थात, लॉरेन्स या प्रसिद्धीच्या पुढे गेले होते!