24 September 2020

News Flash

ली तेंग-हुइ

आजही चिनी दंडेलीला न जुमानता तैवान एक देश म्हणून उभा राहू शकतो, त्यामागील प्रेरणा नजीकच्या भूतकाळात ली तेंग-हुइ यांनीच दिलेली आहे.

ली तेंग-हुइ

नव्वदच्या दशकात भारताचे नववे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी आर्थिक धोरणांची दिशा बदलण्याचे धैर्य दाखवले, तसेच धैर्य तैवानचे अध्यक्ष ली तेंग-हुइ यांनी राजकीय धोरणाबाबत दाखवले होते. सन-यत सेन आणि चांग कै शेक यांच्या काळापासून चीनकडे पाहात, पण स्थानिक हुकूमशहांच्या तालावर चालणाऱ्या तैवानला ‘लोकशाही राष्ट्र’ म्हणून घडवण्याचा चंग ली तेंग-हुइ यांनी बांधला आणि १९९६ मध्ये अध्यक्षपदाची निवडणूक थेट पद्धतीने घडवून तो तडीसही नेला. ली यांची निधनवार्ता ३१ जुलै रोजी आल्यावर फक्त तैवानच नव्हे तर अनेक लोकशाहीप्रेमी देश दु:ख व्यक्त करते झाले. आजही चिनी दंडेलीला न जुमानता तैवान एक देश म्हणून उभा राहू शकतो, त्यामागील प्रेरणा नजीकच्या भूतकाळात ली तेंग-हुइ यांनीच दिलेली आहे.

ली यांचा जन्म १९२१ चा. शेतकरीपुत्र असलेले ली संधी मिळेल तसतसे शिक्षण घेत राहिले आणि  अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठातून १९६८ साली, कृषी-अर्थशास्त्रातील संशोधनावर त्यांनी पीएच.डी.  मिळवली. अमेरिकेत शिकण्याच्या मिषाने जगायला जाणाऱ्यांपैकी ते नव्हते. मायदेशी परतल्यावर ते तत्कालीन सरकारचे सल्लागार म्हणून काम करू लागले. हे पद मंत्रिपदासारखेच होते. ‘कोमिन्टांग’ पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक जीवनातही ते कार्यरत झाले. तैपेई या तैवानी राजधानीच्या शहराचे महापौर म्हणून त्यांची वर्णी १९७८ साली लागली, तर १९८१ मध्ये ते प्रांतिक गव्हर्नर म्हणून नेमले गेले. १९८४ पासून त्यांना उपराष्ट्राध्यक्षपदही मिळाले. त्या वेळचे तैवानी राष्ट्राध्यक्ष चिआंग चिंग- कुओ यांचे पदावर असतानाच निधन झाल्याने अध्यक्षपद ली यांच्याकडे आले. त्यांच्याच काळात, १९९० मध्ये तैवानी विद्यार्थ्यांची लोकशाहीवादी चळवळ सुरू झाली. उच्चविद्याविभूषित ली यांनी त्या चळवळीला दिलेला प्रतिसाद हा सुसंस्कृत राज्यकर्त्यांस शोभणाराच होता. आंदोलकांच्या स्पंदनांचा राज्यप्रणालीतर्फे स्वीकार कसा करावा, याचे मार्ग त्यांनी शोधले. त्याचा परिपाक म्हणजे १९९६ निवडणूक. ती होऊ नये यासाठी चीनने तैवाननजीकच्या समुद्रात युद्धनौकांद्वारे भय दाखवलेच, पण त्यास न जुमानता लोकशाहीचा कृतिकार्यक्रम ली यांनी राबवला. मे २००० मध्ये त्यांनी पद सोडल्यानंतर, २०११ मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता. मात्र २०१३ आणि २०१४ साली, सुनावणी व फेरसुनावणीतून ते निदरेष ठरले. तैवानच्या ज्या भागावर जपानचा ताबा (दुसऱ्या महायुद्धापर्यंत) होता, तेथे जन्मलेले ली जपानी सैन्यात होते आणि पुढेही त्यांचा ओढा जपानकडे होता. मात्र दलाई लामांमुळे भारताशीही त्यांचे भावबंध होते. त्यांच्या निधनाने जागतिक लोकशाहीच्या इतिहासाचा एक दुवा निखळला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 12:01 am

Web Title: lee teng hui profile abn 97
Next Stories
1 राम प्रधान
2 ललिता केंकरे
3 एअर मार्शल विवेक राम चौधरी
Just Now!
X