24 January 2019

News Flash

ब्रिगेडियर नरिंदर सिंग संधू

१९७१ मध्ये पाकिस्तानने नानक पुलावर कब्जा करून पंजाबवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला.

ब्रिगेडियर नरिंदर सिंग संधू

युद्धस्य कथा रम्य: असे म्हटले जाते. १९७१ मध्ये पाकिस्तानबरोबर जे युद्ध झाले, त्यातील मर्दुमकीच्या अनेक गोष्टी आजही अंगावर रोमांच आणतात. त्या काळात पंजाबच्या पश्चिमेकडील शहरात डेराबाबा नानक पूल हा भारतीय शहरांना सियालकोट व नरोवाल या पाकिस्तानी शहरांशी जोडत होता. रावी नदीवरील पुलाची पश्चिम बाजू पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेऊन तटबंदी तयार केली. तेथे मोठय़ा प्रमाणात खंदक उभारून दारूगोळा व सुरुंग ठेवण्यात आले. अशा परिस्थितीत ही कोंडी फोडून पाकिस्तानवर मात कशी करायची असा पेच होता. त्या वेळी लेफ्टनंट कर्नल असलेल्या नरिंदर सिंग संधू यांना या कामगिरीवर पाठवण्यात आले. त्यांनी पाकिस्तानची ही तटबंदी प्रतिकूल स्थितीत मोडून काढली. १९७१ च्या युद्धाचे एक नायक म्हणून ते प्रसिद्ध होते. परवा त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

१९५३ मध्ये ते भारतीय सैन्याच्या पायदळात सहभागी झाले होते. त्यानंतर पहिले युद्ध त्यांनी अनुभवले ते १९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध. त्या वेळी पंजाबमधील उत्तरेला असल येथे दोन्ही सैन्यांत जोरदार धुमश्चक्री झाली. त्यात संधू यांनी पाकिस्तानचे एम ४७ पॅटन रणगाडे नष्ट केले होते. १९७१ मध्ये पाकिस्तानने नानक पुलावर कब्जा करून पंजाबवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांनी १० डोग्रा रेजिमेंटचे नेतृत्व करताना पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले. पायाला गोळी लागलेली असतानाही त्यांनी जवानांचे मनोधैर्य राखत मोर्चा सोडला नाही. ५ डिसेंबर १९७१ ची ती रात्र.. त्या वेळी कर्नल असलेल्या नरिंदर सिंग संधू यांच्यासाठी ती अविस्मरणीय अशीच होती. त्याच रात्री धुक्याने समोरचे काही दिसत नसताना ही मर्दुमकी गाजवली. त्यांना यात ७१व्या रेजिमेंटच्या रणगाडय़ांचे सहकार्य लाभले. त्या वेळी रावीच्या रोरावत येणाऱ्या पाण्यात ते व त्यांचे सैनिक अडकले होते, रणगाडे पुढे जाऊ  शकत नव्हते. त्याही स्थितीत त्यांनी पुढे जाण्याचे ठरवले. पुलापासून २ किलोमीटर अंतरावर असताना त्यांनी आपल्या सैनिकांचे १२-१२ चे गट केले व पाकिस्तानी सैन्यावर हातबॉम्बचा वर्षांव करीत रावी नदीच्या दोन्ही बाजूंनी कोंडी करीत खंदक नष्ट केले. पाकिस्तानचे साठ सैनिक त्यांनी मारले. शेवटी नानक पूल हाती आल्यानंतर १० डोग्रा रेजिमेंटने पाकिस्तानचा दारूगोळाही ताब्यात घेऊन पुढे हल्ला सुरूच ठेवला. ६ डिसेंबरला तांबडे फुटायच्या आत तो पूल पुन्हा भारताने ताब्यात घेतला होता. संधू यांना नंतर ‘महावीर चक्र’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. दुर्दैव असे, की देशासाठी असीम त्याग करणाऱ्यांना आपण लगेच विसरून जातो. संधू यांच्या अंत्यसंस्कारास पंजाबमधील एकही राजकीय नेता उपस्थित नव्हता, यातून हे दिसून येते.

First Published on April 2, 2018 1:17 am

Web Title: lieutenant colonel narinder singh sandhu profile