गोवा आणि कोकण, विशेषत: दक्षिण कोकण ही कलावंतांची भूमी म्हणून सुपरिचित आहे. त्यातही मराठी व्यावसायिक रंगभूमीवर कोकणी माणसांचा पगडा आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. शासनाच्या नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झालेले ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर हे कला आणि कलावंतांची निपज असलेल्या याच प्रदेशातले. जे. जे. कला महाविद्यालयात रीतसर कलेचे शिक्षण घेता घेता दामू केंकरे या नाटय़विद्यापीठाच्या संपर्कात ते आले आणि नाटकमयच झाले. त्या काळी भारतीय विद्या भवनच्या स्पर्धा ऐन भरात होत्या. दामू केंकरेंनी बाबा पार्सेकरांना या स्पर्धात सादर होणाऱ्या एकांकिकांसाठी नेपथ्याची जबाबदारी सोपवली आणि त्यांनी ती संधी साधत नाटकाची जातकुळी अधोरेखित करणाऱ्या नेपथ्याच्या आरेखनात स्वत:ला झोकून दिले. भारतीय विद्या भवनबरोबरच पार्सेकरांचा रंगायन चळवळीच्या बिनीच्या शिल्पकार असलेल्या विजया मेहतांशी संपर्क आला आणि प्रायोगिकतेचे रोपटे जाणीवपूर्वक मराठी रंगभूमीवर रुजवू पाहणाऱ्या या ‘प्रयोगा’चा ते भाग झाले. ‘रंगायन’च्या ‘कावळ्यांची शाळा’ या विजय तेंडुलकर लिखित नाटकाच्या नेपथ्यासाठी बाबा पार्सेकरांना राज्य नाटय़स्पर्धेत पारितोषिक मिळाल्यावर त्यांची कारकीर्द जोमाने सुरू झाली.

पुढे हौशी, प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीसाठी त्यांनी अनेक नाटकांचे नेपथ्य साकारले. नंदकुमार रावते यांच्या ‘ललित कला साधना’ या संस्थेतून त्यांनी नेपथ्यकार म्हणून मुख्य धारेच्या रंगभूमीवर पदार्पण केले. ‘काचेचा चंद्र’, ‘गुंतता हृदय हे’, ‘मला उत्तर हवंय’, ‘रथचक्र’, ‘सूर राहू दे’, ‘हॅण्ड्स अप’, ‘ही श्रींची इच्छा’ अशा रंगभूमी गाजवणाऱ्या अनेक नाटकांचे नेपथ्य बाबा पार्सेकरांनी केले. नाटककार सुरेश खरे यांच्या ‘सागर माझा प्राण’ या नाटकाचे त्यांनी केलेले नेपथ्य जाणकारांची दाद घेऊन गेले. तब्बल ४८५ नाटकांचे नेपथ्य त्यांच्या गाठीशी आहे यावरूनच त्यांच्या कामाचा झपाटा कळून यावा. रंगभूमीच्या संकेतांच्या चौकटीत राहून त्यांनी अनेक कल्पक नेपथ्यरचना केल्या. त्यांना रंगभूमीच्या मर्यादांचेही पक्के भान होते. त्या सांभाळूनच त्यांनी नेपथ्यात कल्पक प्रयोग केले. मुख्य धारेतील रंगभूमी ही सत्तर-ऐंशीच्या दशकात नाटकांच्या दीर्घ दौऱ्यांसाठी प्रसिद्ध होती. अशा दौऱ्यांत सुटसुटीत आणि लवचिक नेपथ्य ही प्राथमिक गरज असते. ते हाताळायला सोपे असणे गरजेचे असे. आखुडशिंगी, बहुगुणी अशा नेपथ्याचे आव्हान बाबा पार्सेकरांनी त्या काळी आणि नंतर ही लीलया पेलले. नेपथ्यकार सहसा नाटकाचा नेपथ्यरचना करताना त्याचे आधी ड्रॉइंग तयार करतात. परंतु बाबा पार्सेकर ड्रॉइंगऐवजी नेपथ्याचे ‘मॉडेल’च तयार करीत; जेणेकरून निर्मात्यासह सर्वानाच नेपथ्याची पुरेपूर कल्पना येई. त्यांनी केलेल्या सुटसुटीत नेपथ्यामुळे ‘सुयोग’च्या ‘श्री तशी सौ’ या नाटकाचा अमेरिका दौरा सोपा झाल्याचे नेपथ्यकार राजन भिसे सांगतात. मात्र नेपथ्यात वास्तवतेचा अतिरेक त्यांना मान्य नव्हता. रंगमंचीय क्ऌप्त्या वापरून केलेले नेपथ्यच त्यांना भावत असे. पुढल्या काळात प्रगत तंत्रज्ञानाने मराठी रंगभूमीलाही कवेत घेतले. प्रेक्षकांच्या  सर्जनशीलतेला आवाहन करणे हे नेपथ्यासह सर्वच घटकांत अपेक्षित असते, या मताचे बाबा पार्सेकर आहेत.

gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
Kiran Mane post For Vasant More
अभिनेता किरण मानेची पोस्ट चर्चेत, “वसंत मोरेंना सलाम, पण मत रवींद्र धंगेकरांनाच, कारण..”
jitendra kumar trivedi bjp
भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप
Pankaja munde and jyoti mete
बीडमध्ये तिहेरी लढत? पंकजा मुंडेंसमोर आता ज्योती मेटेंचंही आव्हान; मविआनं डावलल्यानंतर म्हणाल्या, “पुढची पावलं…”

माणूस म्हणून बाबा अत्यंत मितभाषी आहेत. आपण केलेल्या कामाचे पैसेही न मागण्याएवढा भिडस्त स्वभाव असल्याने अनकेदा त्यांचे पैसेही निर्मात्यांनी बुडवले. परंतु त्याबद्दल आवाज उठवण्याऐवजी ते गप्पच बसणे पसंत करीत. ‘अशा संकोची बाबांना शासनाचा हा घसघशीत रकमेचा पुरस्कार मिळणे म्हणजे  त्यांच्या बुडालेल्या पैशांची नियतीने केलेली परतफेडच’, असे नाटककार गंगाराम गवाणकर गमतीने म्हणतात.